स्टार प्लसच्या अॅन्थेम साँगच्या निमित्ताने…

मी स्टार प्लसचा प्रेक्षक नाही, मात्र कामाचं ठिकाण स्टार हाऊसमध्येच असल्यामुळे स्टार प्लसचे नवीन प्रोग्राम कोणते, चॅनल नवीन काय करतंय, याची कल्पना असतेच. जुने-नवीन शो, त्यांना मिळणारा रिस्पॉन्स किंवा रेटिंग याचीही थोडीफार माहिती असतेच. 26 जानेवारीपासून स्टार प्लसवर अँथेम साँग सुरू झालं. तू ही तू…

सगळ्यात पहिल्यांदा ते काय आहे, हेच कळत नव्हतं.

कारण आमच्या न्यूजरूम हाच स्टुडिओ असल्यामुळे तिथले सर्व टीव्ही म्यूट असतात. पहिल्याच पाहण्यात आवडून गेलं, मग घरी आल्यावर सहज पाहिलं, शांतपणे ऐकलं.. शब्द शब्द समजून घेतला. त्याचवेळी पहिल्यांदा त्यावर नोटीस न झालेला अॅस्टनही पाहिला, स्टार प्लस अॅन्थेम… अलीकडेच बदललेल्या लाल अॅस्टन स्ट्रीपमध्ये…

एखाद्या चॅनलला अँथम असावं ही कल्पनाच किती भन्नाट, एरवी अँथम हे फक्त देशासाठीच असंच शाळेत शिकवल्यामुळे मनावर ठसलेलं.

तशी आपल्याकडे वर्ल्डकप आला की काही उत्साही लोकं त्याचं थीमसाँग बनवतात, ऑलिंपिक असो की फुटबॉल त्याचंही थीमसाँग बनतं, पण त्याला अॅन्थेमचा दर्जा मिळत नाही. ज्या कुणाला ही कल्पना पहिल्यांदा सुचली त्याला हॅट्स ऑफ… नेटवर सर्च केल्यावर कळालं की आजचे आघाडीचे अॅड गुरू पीयूष पांडे यांची संकल्पना… आणि संगीतरचना विशाल भारद्वाज यांची… गायक मास्टर सलीम..

स्टार प्लसचं तू ही तू अॅन्थेम फक्त कानांनी ऐकण्यापेक्षा बघण्याचं आहे, कारण या अॅन्थेम सोबत एक सशक्त अशी कथा गुंफण्यात आलीय.

गाण्याचे शब्द म्हणाल तर त्यात नवीन काहीच नाही, कारण या गाण्यात स्त्री साठी योजिेलेल्या उपमा यापूर्वी अनेकदा देऊन झाल्यात. तरीही पिक्चरसोबत ते गाणं ऐकणं हा एक अनुभव असतो. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी सशक्त असा एक स्टोरीबोर्ड आहे. या गाण्यासाठी सांगितलेली कथा हे सगळ्याच स्त्री-पुरूष प्रेक्षकाचं स्वप्न असतं. अॅन्थेमच्या चित्रीकरणाशिवाय हा प्रकल्प पूर्णच होऊ शकला नसता, म्हणूनच वेगवेगळ्या एफ एम रेडिओवर हे अॅन्थेम ऐकताना तितकीशी मजा येत नाही, जेवढी ती पाहताना येते. कारण टीव्ही चॅनेलचं अॅन्थेम हे पाहण्याचंच असलं पाहिजे, ऐकण्याचं नाही.
tu hi tu…

स्टार प्लसने हे अॅन्थेम जारी करताना स्त्रीच्या वेगवेगळी रूपं, अवतारांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा प्रकल्प असल्याचं जाहीर केलंय. कारण हा वेगवेगळ्या रूपातला स्त्री वर्ग स्टार प्लसचा प्रमुख प्रेक्षक आहे. मार्केटच्या भाषेत बोलायचं तर फीमेल फिफ्टिन प्लस (F15+) पुन्हा या अॅन्थेममधली स्त्री ही एकटी दुकटी नाही तर कुटुंबवत्सल आणि संसारपरायण आहे, आजची स्त्री कितीही करिअरिस्टिक झाली तरी कुटुंबापासून वेगळं करून तिला प्रोजेक्ट करणं चॅनेलवाले असो की त्यामागे असलेल्या मार्केटिंग फोर्सला कुणालाच शक्य नाही. कारण त्यामुळे इथली व्यवस्थाच कोलमडून पडेल. सर्व व्यवस्थेला चॅलेंज करणारी स्त्रियांची तुरळक उदाहरणं असली तरी अपवादापुरतीच…
म्हणूनच कुटुंब आणि करियर यांचा सुवर्णमध्य साधणाऱ्या स्त्रीला वाहिलेली ही मार्केट कृतज्ञता आहे. तरीही निर्मिती आणि सर्जनशीलता या पातळ्यांवर हे अॅन्थेम खूप वरचं आहे.

स्त्री आणि स्त्रीत्वाचा गौरव सांगण्यासाठी रचलेली सुपरवुमनची कल्पना या अॅन्थेमच्या मुळाशी आहे… सकाळी नवऱ्याच्या आधी उठून मुलांचा डबा तयार करून त्यांना शाळेत पाठवणारी आई, पुन्हा नवऱ्याला आपली अनुपस्थिती जाणवू नये म्हणून ओढणी त्याच्या हाताला गुंडाळून ठेवणारी बायको, त्यानंतर पेपर वाचत असल्याचं पाहून साखर खाणारा डायबेटीसवाल्या सासऱ्याला नजरेनेच दटावणारी सून, त्यानंतर सासूबाईंकडून प्राणायाम करवून घेणारी सून, मग नवऱ्याला टॉवेल देण्याचा फिल्मी शॉट, सासूला साड्या वाळवण्यासाठी मदत करणारी सून, ऑफिसला जाणाऱ्या नवऱ्याला गच्चीवरून खडे मारून मागे बघायला लावून फ्लाईंग किस देणारी खट्याळ बायको. घरातली सकाळच्या वेळची ही कामं उरकल्यानंतर बाहेर पडणं म्हणजेच करीअर… त्यातही सायकल रिक्षाला ढकलून त्याचं काम सोपं करणं, किंवा ट्रॅफिकने गच्च भरलेल्या आणि नेमका त्याचवेळी ट्रॅफिक पोलीस चहा पिण्यासाठी गेलेल्या रस्त्यावर ट्रॅफिक नियमन करणारी सजग नागरिक, मधल्या वेळात लहान मुलां-मुलीसोबत फुगडी, लंगडी खेळणं, किंवा कबुतरांना दाणे भरवणं, नृत्य शिकणं, नवऱ्यासोबत सुटीची मजा किंवा पतंगबाजी हेही ओघानेच… घराच्या मोकळ्या भिंतीवर कुठल्या कुठल्या जाहीर सभांची नेत्याचं पोस्टर लावून ती विद्रुप करणारांवर घराच्या छतावरून पाणी टाकणं आणि काठी घेऊन त्यांच्या मागे दात-ओढ खाऊन धावणं… सर्वात शेवटी टीव्हीवर बातम्याचं अँकरिंग करणं…घरी वाढदिवस साजरा करण्याची तयारी, त्यामुळे लवकर जायचं असलं तरी न्यूजरूममधून लवकर पाय न निघणं… आणि घरच्यांनी वाट बघून सर्वांनी झोपी जाणं… मग रात्री उशीरा घरी परतल्यावर सर्वांचा उत्साह पुन्हा जागा करणं… सगळंच विलक्षण… हे जसंच्या तसं कदाचित कुठे घडेल, पण प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात असं घडावं वाटणारं अशी एक चुटपुट लावणार्या सुपर वुमनची कथा या अॅन्थेमसोबत आहे.

कारण या सर्जनशील निर्मितीसोबत यत्र तत्र सर्वत्र स्त्री आहे, मुळात ईव्ह अॅडमच्या काळापासून स्त्री हीच निर्मितीची, सर्जनशीलतेची आदिम प्रेरणा राहिलीय. ही प्रेरणा नेमाड्यांनी ‘जरीला’मध्ये अतिशय नेमक्या शब्दात मांडलीय, चांगदेवला अचानक साक्षात्कार झाल्यासारखं वाटलं, त्याला वाटलं, एका पुरूषाची किती ओल किती आणि स्त्री किती अनेक प्रकारच्या ओलींनी समृद्ध असते… या एका दणकट उदाहरणाशिवाय इतरही अनेक सर्जनशील निर्मितीची उदाहरणं देता येतील… नेमाड पंथीयांनी हिंदू पस्तीस वर्षे वाट पाहिली, कारण ते फक्त वर्षेच मोजत राहिले, नेमाड्यांना जे मनापासून सांगायचं होतं, त्याची वेळ आलीच नव्हती तर, वर्षे किती सरली याचा हिशेबच गैरलागू… चाहत्यांनी फक्त वर्षेच मोजत राहावी, नेमाड्यांची सर्जनशीलता ही त्यांच्या चाहत्यांची बटीक कशी असेल.

हे अॅन्थेम बनवणं हा स्टार प्लसच्या व्यापक मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा भाग असला तरी ती एक उत्तम निर्मिती आहे, त्यामागे अॅडगुरू पीयुष पांडे, संगीतकार विशाल भारद्वाज यांच्यासह अनेकांचा सहभाग असला तरी काही तरी मनापासून सांगायचं असतं तेव्हाच काहीतरी चांगली निर्मिती होते, मला वाटतं हा विचारच या अॅन्थेमच्या निर्मितीच्या मुळाशी आहे. जोपर्यंत काहीतरी दणकट सांगायचं नसतं, तोपर्यंत सशक्त निर्मिती होतच नाही… चांगली अभिव्यक्ती हीच चांगली निर्मिती असते. सर्जनशील असते.. काहीतरी मनापासून दणकट असं सांगायचं नसेल तर जी निर्मिती होते, ती निव्वळ तकलादू आणि वरवरची…

काहीतरी मनापासून सांगायचं नसेल तर निर्मितीच होत नाही, अशावेळी बनतं ते काही तरी तकलादू, कमअस्सल असं… रमेश सिप्पी यांना पुन्हा शोले बनवता नाही आला कारण त्याला जे काही सांगायचं होतं, ते एकाच प्रयत्नात संपलं. त्याचा रिमेक करताना राम गोपाल वर्मालाही पुन्हा तशी निर्मिती करता आली नाही.

सर्जनशील निर्मिती प्रत्यक्षात येण्यापूर्वी बऱ्याच आधीपासून आपल्यातच धडका मारते, वर येण्यासाठी प्रयत्न करते. भूकंप होण्यापूर्वी छोटे-छोटे ट्रेमर भूकंपाची चाहूल देतात, असं म्हटलं जातं… अगदी तसंच… अनेक चांगले सिनेमे, पुस्तकं, कविता, चित्रे, शिल्पे या चांगल्या अभिव्यक्ती आहेत, म्हणूनच त्या चिरंतन सर्जनशील निर्मिती ठरल्या, अगदी अजिंठ्याच्या प्राचीन चित्रांपासून ते अगदी अलीकडच्या जॉन फर्नांडीसच्या चित्रांपर्यंत… तू ही तू सुद्धा याच रांगेतील, थोडासा कमर्शियल आणि उद्देश पूर्णपणे मार्केटिंगचा असला म्हणून काय झालं.

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

1 Comment

  1. खुपच सुंदर लेख आहे मास्तर… यात एक छोटीशी भर टाकतो. मी मराठी या वाहिनीने केलेले अँथम साँग ही वाहिनी चर्चेत आणण्यास कारणीभूत ठरले होते. आजही ते आवर्जून ऐकले जाते.

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: