राज्यातल्या तेल, वेगवेगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू… जीवनावश्यक वस्तू यांमध्ये भेसळ करणारे माफिया, टोलसम्राट, लाचखोर, अवैध वाहतूक करणारी धेंडं, मंत्रालयात आणि इतरत्र आपल्या ऑफिसात बसून लाच खाणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचं मनापासून मानणारे सरकारी-निमसरकारी कर्मचारी, त्यांना लाचलुचपतीच्या जाळ्यात पकडणारे एसीबीवाले, शिवाय नाक्यानाक्यावर वसुली करणारे पोलीस या सर्वांनी कसलेच पैसे खायचे नाहीत, कसलीच भेसळ करायची नाही असं ठरवलं तर किती अनागोंदी माजेल…
मीडियाला बातम्या मिळणार नाहीत, एसीबीवाल्यांना काही काम उरणार नाही, पोलीसही फक्त पोलिस ठाण्यात बसून किंवा नाक्यानाक्यावर बसून चकाट्या पिटत पगार घेतील… कुणाला काही कामच उरणार नाही
मुळात पोलिस या यंत्रणेची गरजच भासणार नाही, गांधीजींना अपेक्षित असलेला डॉक्टर आणि वकील नसलेला आदर्श समाज प्रत्यक्षात येईल…
अराजक निर्माण होईल… ते ही गांधीजींना हवं असलेलं… गांधीजी अराजकाच्याच बाजूने होते… कुणाचंही कुणावरच नियंत्रण नको असलेली शासन व्यवस्था त्यांना हवी होती, म्हणजेच त्यांना स्वयंशासन अपेक्षित होतं…
पण आपल्याला कुणी हाकल्याशिवाय स्वतःला दोन पावलेही पुढे चालता येत नाही, अशा जगात जगणं किती बेचव झालं असतं…