आता आपल्याकडेही ‘नो टीव्ही डे’

29 जानेवारीला मुंबईत नो टीव्ही डे साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलंय. अर्थातच हे आवाहन ही एक जाहिरात मोहीम आहे. एवढंच नाही तर एका बड्या मीडिया ऑर्गनायजेशनने म्हणजे हिंदुस्थान टाईम्सची प्रकाशन संस्था असलेल्या एचटी मीडियाने हा नो टीव्ही डे पाळायचं आवाहन केलंय. त्यासाठी ट्विटर, फेसबुक आणि स्वतंत्र वेबसाईट एवढंच नाही तर लोकल ट्रेन, बस गाड्या, रेल्वे स्थानकं, होर्डिंग यावर जाहिराती झळकावून या मोहीमेचा प्रचार प्रसार करण्यात येतोय.

एक दिवस टीव्ही पाहू नका, त्याऐवजी इतर महत्वाची कामे करून त्याचा आनंद उपभोगा… टीव्ही पाहण्याशिवाय करण्याच्या इतरही अनेक महत्वाच्या बाबी आहेत. मनसोक्त भटकणं, वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती घेणं, नवीन काहीतरी वाचणं, लोकांना-मित्रांना भेटणं असं बरंच काही.

आपल्याकडे पहिल्यांदाच असा प्रयत्न होतोय, पाश्चिमात्य देशात असे कॅम्पेन फार जुने झालेत. मात्र आपल्याकडे जाहीरात कॅम्पेनच्या माध्यमातून आपला हेतू साध्य करून घेण्याची शक्कल पहिल्यांदाच लढवली जातेय.

तसं पाहिलं तर मुंबईत अनेकांचे अनेक दिवस नो टीव्ही डे असतातच…

मुंबईत दिवसभर घरातली कर्ती मंडळी कामाधंद्याच्या निमित्ताने बाहेरच असतात. त्यामुळे दिवस तसा नो टीव्ही डे असतोच, त्याशिवाय कुठे सहलीला किंवा गावाला जातानाही टीव्ही बंदच… हे झालं शहरापुरतं… तिकडे ग्रामीण भागात आपल्या सरकारच्या कृपेनं सुरू असलेल्या लोडशेडिंगमुळे दिवसच्या दिवस लोडशेडिंग असतंच की.

तरीही एखाद्या कुटुंबापुरती किंवा व्यक्तिगत पातळीवर राबवण्यासाठी नो टीव्ही डे ही खरोखरच एक चांगली कल्पना आहे, कारण टीव्हीच्या अनेक दुष्परिणामांमध्ये विचार करण्याची शक्ती, कुवत नष्ट होणे हा एक महत्वाचा दुष्परिणाम आहे. अर्थातच हा तासन् तास टीव्ही बघणं किंवा टीव्हीतल्या कार्यक्रम किंवा माहिती-मजकुराचं अनुकरण करण्याने होतं. खरं तर हे सर्वांच्याच बाबतीत खरं ठरू नये.. कारण काही जणांना टीव्हीमुळे नव नव्या आयडियाही सुचतील, किंवा नव्याने विचार करण्याची प्रेरणाही मिळेल. पाश्चिमात्य देशात अनेक घरांमधून एक असा नो टीव्ही डे पाळला जात असल्याबद्धल मागे कधीतरी वाचलं होतं. आपल्याकडे टीव्ही हा घरातला एक सदस्य असतो. ज्याच्या हाती रिमोट तो घराचा कर्ता किंवा कर्ती… किंवा लाडाचा सदस्य असं काहीही असू शकतं.

घरातला टीव्ही सुरू असला तरी घरातल्या प्रत्येकावर टीव्ही पाहिलाच पाहिजे हे तसं बंधनकारक नसतंच. त्यामुळे आपल्या आवडीचा नसलेला कार्यक्रम पाहिलाच पाहिजे हे बंधन टीव्ही प्रेक्षकांवर कधीच नसतं. म्हणूनच आपल्याकडे या कॅम्पेनला कितपत यश मिळेल, याविषयी साशंकता आहेत.

मागे कधी तरी रिक्षा-टॅक्सी यांच्या अरेरावी संदर्भात मीटर जाम नावाचं कॅम्पेन सुरू झालं होतं. या कॅम्पेनने फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून आकार घेतला. त्यावेळी याची जेवढी चर्चा झाली, तेवढा त्याला प्रतिसाद मिळाला नाही, हे ही मात्र खरं… कारण मुंबई आणि मुंबईकरांच्या गरजा आणि प्राधान्यक्रम दोन्ही वेगवेगळी आहेत. फेसबुक-ट्विटरवर या कॅम्पेनला प्रचंड प्रतिसाद मिळाला. एका जाहिरात एजन्सीत काम करणाऱ्या तिघांनी या कॅम्पेनला जन्म दिला होता. पुढे त्यांनीच या कॅम्पेनचं नेतृत्वही केलं, मात्र नंतर काही प्रवासी आणि ग्राहक संघटनांनी या कॅम्पेनमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. तिथेच हे कॅम्पेन फसल्याचं स्पष्ट झालं.

आताही नो टीव्ही डे कॅम्पेनची संकल्पना चांगलीच आहे, टीव्ही पाहावा, आवश्यकते एवढाच, फक्त करमणूक आणि माहिती मिळवण्याच्या अनेक साधनांपैकी एक एवढीच त्याची उपयुक्तता आहे, ती तेवढीच राहावी, त्याच्या आहारी जाऊ नये, हे सर्वानाच समजेल. आपली दैनंदिन कामे सोडून टीव्हीसमोर बसावं असं कुणालाही अपेक्षित नसेल. एकदा हे समजलं की नो टीव्ही डे साजरे करण्याची मुळात गरजच भासणार नाही.

पण टीव्हीचे अनेक दुष्परिणाम आपल्याकडे जाणवतात, सतत टीव्ही बघण्याने लहान मुलांवर होत असलेल्या शारिरीक आणि मानसिक परिणामांवर देशाविदेशात अभ्यास -संशोधन होत आहे, त्यामुळे त्यांनी पालकांच्या मार्गदर्शनात टीव्ही बघणं अपेक्षित आहे, पण पालकांना तेवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे आताच्या नो टीव्ही डे अभियानाला एक सकारात्मक प्रतिसाद अशा पालकांकडून मिळू शकतो. त्यात तसं काही गैरही नाही.

एचटी मीडियाने या अभियानाचं नेतृत्व केल्यामुळे या नो टीव्ही अभियानाकडे प्रिंट विरूद्ध टीव्ही असंही पाहिलं जाण्याची शक्यता आहे, मुळात ही दोन्ही माध्यमे परस्परांची स्पर्धक नसून एकमेकांना पुरकच आहेत. पण एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्यासारखं करणं ही कधी कधी त्यांची व्यावसायिक गरज बनते.

आपल्याकडे एसटी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना उगाच ट्रॅवल्स आणि परवानाधारक खाजगी वाहतुकीविरूद्ध ओरड करायची सवय ही नंतर नंतर त्यांची व्यावसायिक गरज बनते तशीच टीव्हीने पेपरविरूद्ध आणि पेपरने टीव्ही विरूद्ध स्पर्धा करणं व्यावसायिक गरज बनलीय.

मुळात पूर्ण दिवस नो टीव्ही डे हे अभियान मुंबईसारख्या लोडशेडिंगमुक्त असलेल्या शहरातच शक्य आहे. कारण उवर्रित महाराष्ट्रात म्हणा किंवा सरकारच्या कृपेने दिवसभर अखंडित वीजपुरवठा नसल्याने बहुतेक दिवस हा नो टीव्ही असतोच असतोच. त्यामुळे त्यांना या नो टीव्ही डे चं तसं काही कौतुक नसणारच…

तसं जगभरात यूएनच्या वतीने एक दिवस पाळला जातो, पण तो फक्त टीव्ही डे आहे, हा दिवस आहे जागतिक टीव्ही दिन… 21 नोव्हेंबर 1996 पासून यूएनने 21 नोव्हेंबर हा जागतिक टीव्ही दिन म्हणून साजरा करायला मंजुरी दिली. 1996 च्या डिसेंबरमध्ये जेव्हा या ठरावावर यूएनमध्ये चर्चा झाली, तेव्हा अकरा प्रतिनिधींनी त्याला तेव्हाही विरोध केला होता. मात्र त्यांचा टीव्हीला मुळीच विरोध नव्हता, तर त्याचं म्हणणं होतं की संयुक्त राष्ट्रांमध्ये आधीच याच धर्तीवरचे तीन दिवस साजरे केले जातात, त्यात पुन्हा टीव्हीसाठी वेगळा दिवस कशाला. जागतिक टीव्ही दिनाला विरोध करणाऱ्या या अकरा जणांच्या मते तेव्हा संयुक्त राष्ट्रांमध्ये जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य दिन (वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे) जागतिक दूरसंचार दिन (वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन डे) आणि जागतिक विकास माहिती दिन (वर्ल्ड डिवलपमेंट इन्फॉर्मेशन डे) असं असताना पुन्हा एक टीव्ही डे जाहीर करणअयाने काहीच साध्य होणार नाही. तसंच टीव्ही डे हा एका श्रीमंत समुदायाचा दीन होऊन जाईल, कारण टीव्ही हा जगातल्या एका मोठ्या समुदायापर्यंत माहिती पोहोचवण्याचं महत्वाचं आणि प्रभावशाली माध्यम असलं तरी आजही (त्यावेळी – 1996 च्या सुमारास) टीव्हीचा प्रसार एका मर्यादेतच झालाय. (आता टीव्हीचा प्रसार बऱ्यापैकी झाला असला तरी वीजेचा पुरवठा आणि हे प्रभावशाली माध्यम तसंच समाज यांच्यातली दरी यामुळे नो टीव्ही डे हे एक मर्यादित समुदायापुरतचं अभियान बनणार आहे.

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: