महाराष्ट्राबाहेरचे पाच दिवस…

सुटी एन्जॉय करायची होती तर मग महाराष्ट्रातच का करावी, म्हणून जाणीवपूर्वक राज्याबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. तयारी काहीच नव्हती. सगळंच आयत्यावेळी ठरवलेलं… सुटी घ्यायचीय, फिरायला जायचंय, हे

तसं फार आधीपासून ठरवलेलं, पण कुठे आणि कधी जायचं हे काही ठरत नव्हतं. सर्वजण जातात म्हणून सर्वात शेवटी मैसूर, ऊटी आणि कुन्नूरचा पर्यायावर एकमत झालं. मग त्यासाठी व्हाया बंगळुरू करत आम्ही मैसूरला दाखल झालो.

सध्या काही दक्षिण भारतात टुरिस्टचा हंगाम नाही. त्यामुळे उलट कडाक्याच्या थंडीमुळे सहलीचे अनेक प्लॅन आयत्यावेळी रद्द होतात. त्यामुळे आधी बुकिंग न करताही राहण्यासाठी कुठेच अडचण नाही आली. आधी ईटीव्ही कन्नडमध्ये असलेल्या बंगळुरूच्या एका मित्राची मदत घेतली. त्याने आवश्यक ती सर्व मदत केली. सहलीचा प्लॅन कसा असावा, याचंही त्याने चांगलं मार्गदर्शन केलं. बंगळुरला मी इथे इथे भेटतो, असंही सांगून आम्हाला आश्वस्त केलं.

मैसूर, उटी आणि कुन्नूर या तीनही टूरिस्ट स्पॉटची सबंध इकॉनॉमीच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून आहे. मैसूरला काही थोडे उद्योगधंदे असले तरी एकेका रस्त्यावर तीन तीन चार चार लॉज आणि हॉटेलं तुम्हाला दिसतात, म्हणजे टुरीझमशिवाय दुसरा प्रमुख व्यवसायच नाही, स्वाभाविकच आहे म्हणा

मुंबई-बंगळुरू हा विमानप्रवास असल्याने फारसं काही अप्रुप नाही. तासा-दीडेक तासात तुम्ही बंगळुरात पोहोचता. बंगळूरचं नवं विमानतळ प्रशस्त आहे. तसंच शहारापासून चांगलंच लांब आहे. एअरपोर्टच्या बाहेर पडता पडता तुम्हाला सर्व विमानतळांवर करावा लागतो तसा टॅक्सीवाल्यांचा सामना करावा लागतो. सगळेच स्वस्तात शहरात हव्या त्या ठिकाणी नेण्यास तयार असतात. पण मित्राने आधीच सल्ला दिला होता की महापालिका परिवहनच्या व्होल्वो बसमधूनच शहरात या… हा खूपच चांगला पर्याय आहे.

आम्हाला हवी असलेली बस दहा मिनिटात आली. मोडकं तोडकं हिंदी येणाऱ्या ड्रायव्हरला विचारून आपल्याला हवी असलेली बस तीच असल्याची खात्री करून घेतली. या बस फक्त एअरपोर्ट ते शहरातली काही महत्वाची ठिकाणं अशीच प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळेच देशाविदेशातून भरपूर सामान घेणाऱ्या प्रवाशांच्या सामानासाठी या बसमध्ये ऐसपैस जागा असते. शिवाय आरामदायी वातानुकुलीत प्रवास. बंगळूरू शहराचा पहिला अनुभव तर सुखद आणि वातानुकुलीत होता. तब्बल दीडेक तासानंतरच्या प्रवासानंतर या व्होल्वो बसने आम्ही बंगळूरूहून मैसूरला जाणाऱ्या बसस्थानकावर पोहोचलो. म्हणजे मुंबईहून बंगळुरूला पोहोचायला जेवढा वेळ तेवढाच आम्हाला बंगळुराच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला पोहाचायला लागला होता. फक्त फरक हवाई मार्ग आणि भरगर्दीतल्या शहरी रस्त्यांचाच होता.

बंगळूरूमध्ये वेगवेगळ्या मोठ्या गावाला जाण्यासाठी वेगवेगळी बसस्थानके आहेत. आपल्याकडे पुण्या-मुंबईत अशी पद्धत आहे. तिथे बहुतेक अलीकडेच अशी पद्धत सुरू झाली असावी, कारण बसस्थानक अगदी नवंनवं आणि चकाचक होतं. मग मैसूरला जाणारी व्हॉल्वो आली. कर्नाटक राज्य परिवहनने त्याला ऐरावत असं नाव दिलंय. आंध्र प्रदेश परिवहनच्या व्होल्वो सेवेला गरूडा असं नावं आहे, तर आपल्याकडे त्याला शिवनेरी बस म्हणतात. ऐरावत येण्यापूर्वी अनेक कंडक्टरांनी आम्हाला नॉनस्टॉप एक्स्प्रेस बसने मैसूरला जाण्याचा सल्ला दिला होता. ऐरावत बसला अजून वेळ आहे, ती वेळेवरच सुटेल याचा नेम नाही, असंही त्यांनी कन्नडमध्ये सांगितलं होतं. हे समजण्याचं कारण म्हणजे आमचा दुभाषा मित्र आमच्यासोबतच होता. त्याने आम्हाला कंडक्टर आणि त्याच्यात सांगितलेलं सर्व बोलणं हिंदीत अनुवादीत करून सांगितलं. पण आम्ही ऐरावत व्होल्वोनेच जाण्याच्या निर्णयावर ठाम होतो. शेवटी आला एकदाचा ऐरावत…

बंगळुरू आणि मैसूर या दोन शहरात सुमारे तीन तासांचं अंतर आहे. बसला बंगळूर शहर पार करायलाच अर्धा तास लागला, म्हणजे पुढचं अंतर फक्त दोन-अडीच तासांमध्येच ऐरावताने पार केलं. रस्ता अतिशय चांगला तसंच पूर्ण रस्त्यावर म्हणजे स्टार्ट टू एंड डिव्हायडर असलेला. हा रस्ता सुरू झाला तेव्हाच मला वाटलं की या रस्त्यावर किमान दोन तरी टोल नाके असणार.. कारण महाराष्ट्रातला अनुभवच असा आहे. पण या रस्त्यावर एकही टोलनाका नव्हता, हे पाहून आश्चर्यच वाटलं. गाडी ठरलेल्या वेळेप्रमाणे अडीच तासात पोहोचली सुद्धा… वाटेत लागलेलं एकच गाव लक्षात राहिलं म्हणजे समजलं ते मंड्या… हे गाव पूर्वीही कधीतरी ऐकलं होत. कशासंदर्भात ते आठवत नाही. बाकी सर्व गावांची नावे कन्नडामध्येच असल्यामुळे समजली नाहीत, मंड्याचा उल्लेख कुठेतरी इंग्रजीत होता, तेवढाच समजला. बाकी ऐरावत मध्ये कुठेही न थांबता थेट मैसूरला पोहोचला.

हैदराबादला असताना आम्ही कन्नडला जिलेबीची गळेपडू भाषा असं म्हणायचो… कारण कन्नडिगांच्या बोलण्यात गळू हा शब्द फारवेळा येतो, त्याचा अर्थ काय हे कधी शोधायच्या भानगडीत पडलो नाही. सर्वात आधी ऐकलेलं कन्नड वाक्य असं होतं,
“नमस्कार, ईटीव्ही कन्नडा नाडी, वार्तागळू सुस्वागतम्… तेलुगूवाले म्हणायचे, नमस्कार, ईटीव्ही वार्ता, मुख्यांशालु… असं काहीतरी
हैदराबादला असताना असं वाटायचं की उगाच लू लू लू असं म्हटलं की तेलुगू होतं आणि गळू गळू म्हटलं की कन्नडा… शिवाय या दोन्ही भाषांचं स्क्रीप्ट जवळ जवळ सारखंच आहे. त्यामुळे तब्बल चार वर्षाच्या खंडानंतर पुन्हा हैदराबादलाच गेल्यासारखंच वाटतं. कारण बाहेर रस्त्यावर दिसत असलेल्या पाट्या आणि हैदराबादच्या पाट्या यामध्ये काहीच फरक नव्हता.

मैसूरला पोहोचल्यावर बंगळूरच्या मित्राने आधीच सांगितलेला त्याचा मित्र बसस्थानकावर आला होता. त्याने एक चांगलं हॉटेल आधीच पाहून ठेवलं होतं, फारसं महागडंही नव्हतं. सोय चांगली होती. महाराष्ट्राबाहेरच्या पाच दिवसातला पहिला दिवस संपला होता, पहिल्या दिवस बंगळुरूच्या एअरपोर्टचा आणि एकही खड्डा आणि टोलनाका नसलेल्या बंगळुरू-मैसूर रस्त्याचा होता.

दुसरा दिवस मैसूर फिरण्याचा. काहीच माहिती नसल्यामुळे स्वतंत्र कॅब न करता सार्वजनिक टुरिस्ट बसचं तिकीट काढून ठेवलेलं. त्यांचे काही स्पॉट ठरलेले, तुम्हाला तुमच्या हॉटेलवरून पिकअप करतात आणि दिवसभर फिरून झाल्यावर ड्रॉपही करतात. मैसूरचा राजवाडा, प्राणिसंग्रहालय, वस्तूसंग्रहालय, चामुंडादेवी, दगडी महानंदी ही तशी शहरातली ठिकाणे… प्रत्येक ठिकाणी बसचा गाईड थोडाथोडा वेळ देतो. त्यानंतर त्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे राज्य सरकारच्या मालकीचं हस्तकला आणि ग्रामोद्योग वस्तू विक्रीचं दुकान. सर्व टुरिस्टना या दुकानाची सफर घडवलीच जातो, तुमच्या दिवसभराच्या टूरचा प्लॅनच अशा पद्धतीने बनवतात की खरेदीला पुरेसा वेळ राहावा, त्याचं कमिशनही ठरलेलं असावं. मग दुपारच्या सत्रात सुरू होतात शहराबाहेरची ठिकाणं, टिपू सुलतानचा उध्वस्त झालेला किल्ला, त्याचं प्रार्थनास्थळ, राजवाडा… सर्व काही उध्वस्त झालेलं… या ठिकाणाचं श्रीरंगपट्टणम… हे सगळं गाईड आपल्याला बसमधूनच दाखवत असतो, दिसत काहीच नसतं तरी आपण खिडकीतून पाहत राहतो. श्रीरंगपट्टणमला ते रंगनाथाचं मंदिर मात्र आवर्जून दाखवतात.

हे विष्णुच्या शेषशायी अवतारातलं शिल्प आहे.

त्यापूर्वी ते फिलोमीना चर्च दाखवतात. इथे आल्यावर दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. त्याम्हणजे… सर्व टूरिस्ट इथेही चप्पल काढून आतमध्ये जातात, आणि क्रॉसला मनोभावे हात जोडून नमस्कार करतात. ज्यांना या चर्चमध्ये आपला देव नाही, हे आधीच माहिती असतं ते मात्र बिनदिक्कत चप्पला बूट पायातच ठेवतात. ज्याच्या त्याच्या श्रद्धे-अश्रद्धेचा प्रश्न… पण या चर्चमध्ये असलेल्या मदर मेरी आणि फिलोमीना यांच्या मूर्त्यांना मात्र भारतीय पद्धतीची साडीच गुंडाळलेली आहे. अगदी निऱ्या वैगेरे असलेली.. हे बदल तुमचं लक्ष ठळकपणे वेधून घेतात.

मग सर्वात शेवटी म्हणजे अंधार पडायला लागल्यावर गाडी निघते, वृदांवन गार्डनच्या दिशेने… वृंदावन गार्डन दोनेक तासात पाहून होतो. पाण्याच्या कारंज्यांचा नृत्याविष्कार पाहण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी ऑफ सीझनमध्येही असते, सीझनमध्ये तर काय गर्दी असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. एखाद्या जत्रेपेक्षाही जास्त गर्दी वृंदावन गार्डनला होती. अंधार असल्यामुळे धरण बघताच आलं नाही. फक्त गाईडने न चुकता धरण बांधणाऱ्या इंजिनीयरचं नाव सांगितलं – सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या…

महाराष्ट्राबाहेरच्या पाच दिवसातला दुसरा दिवसही संपला.

तिसरा दिवस होता, ऊटीकडे प्रस्थान करण्याचा. ही सुद्धा एक टुरिस्ट मिनीबस होती. फक्त तेरा टुरिस्ट बसू शकतील एवढीच त्याची कपॅसिटी. नऊ वाजता निघालेली बस, मैसूर ऊटी मार्गावर दोन थांबे घेते, दोन्ही थांबे खाण्यापिण्याचे आणि खरेदीचे… गाईडच्या योग्य त्या परसेंटेजचे… दोन्ही थांबे पूर्वापारपासून ठरलेले.. एक नाही तर या मार्गावरून जाणाऱ्या अनेक बस याच ठिकाणी थांबतात. आपल्याकडे लांब पल्ल्याच्या बस काही ठराविक हॉटेलांवर थांबे घेतात, अगदी तसंच…

मैसूर-ऊटी अंतर 110-120 किलोमीटरचं… रस्ता नागमोडी, तिथल्या सरकारी भाषेत किमान चाळीसेक तरी हेअरपिन बेंडचा.. तीव्र उतार आणि तितकाच तीव्र चढ… पोटातलं पाणी ढवळणारा आणि ड्रायव्हरचं कौशल्य पणाला लावणारा चढ…तेव्हाच मैसूरहून ऊटीला फारश्या मोठ्या गाड्या का जात नसाव्यात याचा उलगडा झाला, कारण तामिळनाडू आणि कर्नाटक परिवहनच्या गाड्या सोडल्या तर सर्व टूरिस्ट बस या मिनीबस प्रकारात मोडणाऱ्याच होत्या. रस्त्यातच आमच्या गाईडने बांदीपूर जंगल सुरू झाल्याची माहिती दिली. या जंगलात हिंस्त्र श्वापदं मुक्त संचार करत असल्याची माहितीही त्याने पुरवली. कर्नाटकाच्या हद्दीत या जंगलाला बांदीपूर अभयारण्य तर तामिळनाडूच्या हद्दीत या जंगलाला मधुमलाई असं नाव आहे. कधी काळी तामिलनाडू आणि कर्नाटकात हैदोस घालणाऱ्या वीरप्पनचं सत्यमंगलम् जंगल या मधुमलाई-बांदीपूरला चिटकूनच, वेगवेगळ्या बाजूने वेगवेगळी नावे.

या जंगलात हिंस्त्र प्राणी फिरतात, असं गाईडने सांगितल्यामुळे सर्वांनीच कॅमेरे सरसावले होते, पण काही माकडं आणि हरणं यांच्याशिवाय कुणीच दर्शन दिलं नाही. बांदीपूर म्हणजे कर्नाटकची हद्द संपवून तामिळनाडू हद्दीतल्या मधुमलाईमध्ये आल्यावर एका हत्तीने पाठमोरं दर्शन दिलं.. तेवढीच… गजगामिनीची आठवण झाली.

ऊटी आल्याची जाणीव गाईड करून देतो, ती बोट क्लब आल्याचं सांगून त्यापूर्वी अख्यंक हेअरपिन बेंडमुळे ड्रायव्हर प्रमाणेच आपलीही दमझाक होते. मैसूरहून ऊटी म्हणजे तीव्र चढाचा रस्ता तर उटीहून कुन्नूरमार्गे कोईमतूर म्हणजे तीव्र उताराचा रस्ता, समुद्रसपाटीपासून तब्बल सात-साडेसात हजार फूट अंतरावरचं हिल स्टेशन… बोट क्लबमध्ये पॅडल बोट मारण्याचंही अवसान उरत नाही. त्यानंतर गाईड तुम्हाला बोटॅनिकल गार्डनमध्ये सोडून देतो. मैसूरहून आलेल्या टूरिस्ट बसची आणि त्यातल्या गाईडची ड्युटी इथेच संपते.

मग तिसरा दिवसही… हा दिवस संपण्यापूर्वी हा गाईड ऊटीतल्या आणि आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांना जाण्यासाठी कोण कोण उत्सुक आहे, याची माहिती मिळवतो, ते कोणत्या हॉटेलात थांबलेत, तेही विचारून घेतो, उद्या तुम्हाला पिकअप करायला बस येईल, असंही सांगतो. त्याची सेवा घ्यायची नसेल तर जबरदस्ती नाही. तुमचं तुम्हीही फिरू शकता.

ऊटीमधलं महत्वाचं आकर्षण म्हणजे ऊटी-कुण्णूर या मीटर गेज ट्रेनचा प्रवास, या निलगिरी हिल्स ट्रेनचा अलीकडेच युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज म्हणून गौरव केलाय. कुन्नूरही ऊटी इतकंच सुंदर आणि निसर्गरम्य आहे.

मग परतीचा प्रवास सुरू होतो. तामिळनाडू आरटीसी बस दोन दरवाज्यांची.. कुन्नूरहून कोईमतूरला पोचवणारी. संबंध प्रवासात ड्रायव्हर तमिळ सिनेमातल्या गाण्यांची टेप वाजवत असतो. आपल्याला त्यांची भाषा कळतच नाही, पण या गाण्यांच्या अंमलातच तो अतिशय अवघड असा निलगिरींच्या पर्वत रांगाचा तीव्र उतार पार करतो.

निलगिरी हा ऊटी म्हणजेच रेल्वेच्या भाषेत उदगमंडलम् चा जिल्हा… निलगिरी जंगल आणि त्यावरून पडलेल्या पर्वतरांगामुळे या जिल्ह्यालाही हेच नाव पडलं असावं.

शेवटच्या दिवशी कोईमतूर विमानतळाला पोहोचायचं असतं. कुन्नूरला एसटी स्थानकातल्या निळ्या गणवेशातल्या अधिकाऱ्यांनी सुमारे तीन तास लागेल असं सांगितलेलं असतानाही तमिळ गाणी ऐकत ड्रायव्हरने चक्क सव्वा दोन तासात पार केलं. त्यानंतर दोनेक शहर वाहतुकीच्या बस बदलून कोईमतूर विमानतळावर पोहोचता येतं.

विमानतळाच्या भव्य प्रवेशद्वारावरच या विमानतळाला आयएसओ 9000 किंवा असंच काहीतरी आकड्याचं गुणवत्ता मानांकन मिळाल्याची शेखी मिरवली जाते, त्याखाली कुठल्यातरी सालाचा सुद्धा उल्लेख असतो.

त्यामुळे विमानतळाच्या इमारतीत प्रवेश करताना, जरा भारावल्यासारखं होतं पण तिथे सुरू असलेले फॅन (आयएसओ गुणवत्ता प्राप्त विमानतळावर एसी नसतो) आणि भिंतीवर पट्ट्या ठोकून केलेलं इलेक्ट्रिक फिटिंग पाहिलं की कधी कोणे एके काळी हे आयएसओ मानांकन मिळालं असेल, असंही वाटतं. त्याशिवाय आणखी एक आश्चर्यकारक बाब म्हणजे या विमानतळावर पहिल्यांदा तमिळमध्ये उद्घोषणा होते, त्यानंतर इंग्रजी आणि मग हिंदी… मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अजूनपर्यंत मराठीत उद्घोषणा ऐकू आलेली नाही. मी महाराष्ट्राबाहेर उत्तरेत दिल्ली आणि दक्षिणेत यापूर्वी हैदराबाद आणि आता बंगळुरू, कोईमतूर एवढाच विमानप्रवास केलाय, पण त्यावेळी हा फरक ठळकपणे लक्षात आला नव्हता. कोईमतूरहून विमानमार्गे मुंबईत परतल्यावर महाराष्ट्राबाहेर घावललेले पाचही दिवस संपतात.

या पाचही दिवसांनी रिफ्रेश केलेलंच असतं, पण नवी माहितीही दिलेली असते. बरंच काही शिकवलेलं असतं, फसवणुकीसह खरेदीचे नवनवे अनुभव दिलेले असतात.

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

1 Comment

  1. Meghya …mast trip zaliye tuzi….. tuzya ya anubhavacha mala nakkich fhayda hoil bahutek…karn me sudha janar aahe banglore uti maisoor la …may be next month…:)

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: