मा. अजित पवार
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
आपण रविवारी नऊ तारखेला बार्शीला जाणार आहात, असं वृत्तपत्रांमधून आणि माझ्या बार्शीतल्या मित्रांकडून कळालं. चांगली गोष्ट आहे. बार्शीत आपलं चांगलं स्वागत होईलच…
तिथे तुम्हाला माहितीच असेल की, यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन आपल्या हस्ते होणार आहे. गेल्या 15-20 वर्षांपासून या केंद्राची निर्मिती होते आहे, आता ते पूर्ण झालंय. बार्शीकरांना विरंगुळ्याचं एक साधन मिळणार आहे.
माझा मुद्दा वेगळाच आहे.
मी तुमच्या फेसबुक पेजवर स्टेटस् फाईल केलंय, की तुम्ही बार्शीला जाताना हेलिकॉप्टरने न जाता रस्तामार्गे कारने गेलं पाहिजे… त्याविषयी मला विस्ताराने लिहायचं आहे.
माझ्या असं पाहण्यात आलंय की कुणी व्हीआयपी येणार की गावातले रस्ते सुधारतात, गाव कसं चकाचक होतं. मलाही वाटतं की बार्शी चकाचक व्हावं..
आपल्या महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, ज्या ज्या गावाला जातात, तिथले रस्ते सुधारतात, चकाचक होतात. टेंभलीचं उदाहरण तुम्हाला माहितीच असेल, आपल्या महाराष्ट्रातलंच आहे. सोनिया गांधी आणि पंतप्रधान येणार म्हणून गावाचं रूपडं एका रात्रीत पालटलं. तसंच बार्शीचं व्हावं असं मला वाटतं.
मी तुम्हाला हेलिकॉप्टरने न जाता रस्तामार्गे जाण्याची विनंती करतोय कारण, तुम्हाला मग आमच्या बार्शीला येण्यासाठी कुर्डूवाडी शिवाय दुसरा पर्याय नाही. कुर्डूवाडी रस्ता चंद्रांच्या पृष्ठभूमीपेक्षाही खडतर झालाय. फक्त 33 किलोमीटरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी चक्क एक ते दीड तास लागतो. या मार्गावरून जाणाऱ्या प्रवासी गाडीत कितीही चांगल्या दर्जाचं एअर सस्पेन्शन असूद्या, हा रस्ता तुमच्या शरीरातील सर्व हाडे खिळखिळी करून देतोच देतो.
या रस्त्याची दुरूस्ती नगरपालिका आणि सरकारचा बी अँड सी यांच्यापैकी कुणी करायची याविषयी काहीतरी वाद आहे म्हणे.. पण या दोन्ही रत्याच्या दोन्ही टोकांना टोल नाके आहेत, हा भाग वेगळा… पण दोन्ही टोलनाक्यांना या भीषण रस्त्याशी काहीच घेणं देणं नाही. कारण एक टोलनाका बार्शी – लातूर बायपासचा आहे तर दुसरा कुर्डूवा़डी रेल्वे ब्रीजचा..
मागे कधीतरी, आता नेमकी वर्षे आठवत नाही, मी लहान होतो खूप… बार्शीत काका आले होते, ते तेव्हा देशाचे संरक्षण मंत्री होते, कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं होतं. तेव्हा बार्शीतले रस्ते चकाचक झाले होते, त्यानंतर कुणी मोठा व्हीआयपी नेता बार्शीकडे फिरकलाच नाही. निवडणुकीच्या काळात येतात काही जण, पण त्यावेळी आचार संहिता असते म्हणून त्यांच्यासाठी रस्तेदुरूस्ती होत नाही. आता निवडणुकांची आचारसंहिता नाही, त्यामुळे तुम्ही हवाईमार्गाऐवजी रस्तामार्गे बार्शीला जाण्याचा निर्णय घेतला तर रस्ता तातडीने दुरूस्त होईल, युद्धपातळीवर रातोरात… त्यामुळे दादा एवढा एक निर्णय घ्याच, आणि रस्तामार्गे बार्शीला या…
तुमचा दौरा आटोपल्यानंतर नंतर कुणा मोठ्या नेत्याचा कार्यक्रम आमच्या बार्शीत लवकर होईलसं दिसत नाही, कारण यापूर्वीही असा कार्यक्रम झालेला नाही. त्यामुळे पुन्हा रस्ता दुरूस्तीसाठी कुणा मोठ्या नेत्याच्या कार्यक्रमाची आम्हाला वाट पाहावी लागेल, म्हणून यावेळीच रस्तामार्गे बार्शीला येण्याचा निर्णय घ्या…
या मार्गावर काही एकेरी पूलही आहेत. म्हणजे एकावेळी एकच वाहन पुलावरून जाऊ शकतं. समोरच्या वाहनाला थांबावं लागतं, हे दोन्ही पूल ब्रिटीशकालीन आहेत, त्यांचं आयुष्यमान केव्हाच संपलंय. तरीही ते वाहनचालकांना सेवा देतात, ते पूल एवढ्यात दुरूस्त होणार नाहीत, तुम्हालाही याच पुलाचा वापर करावा लागेल, तसं तुम्हाला ताफ्याला एकेरी वाहतुकीसाठी ताटकळत बसावं लागणार नाही. कारण तुम्ही येणार म्हणून या पुलावरची वाहतूक पोलीस तासभर आधीच बंद करतील.
या रस्ता आधी खूप चांगला होता, बाजूला बार्शी लाईट ट्रेन धावायची… कुर्डूवाडीला जाताना रस्ता असो की ट्रोन मजा यायची… पण आता या रस्त्यावरून प्रवास ही शिक्षा असते. आता रेल्वे बंद पडलीय. रूंदीकरणानंतर त्याचा मार्गही बदललाय. पण रस्ता आहे तेवढाच आहे.
मी ऐकलंय की टेभुर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-लातूर हा रस्ता लवकरच चौपदरी होणार आहे, पण हे लवकरच म्हणजे कधी ते माहिती नाही. कदाचित तुम्ही या मार्गाने प्रवास केलात तर हे लवकर दृष्टीक्षेपात येऊ शकेल.
राष्ट्रवादीच्या ताज्या अंकात म्हणे तुम्ही आमदार दिलीप सोपल यांच्याच सल्ल्याने राज्य कारभार करणार, असं काहीतरी म्हणाल्याचं चौकटीत छापून आलंय, आता तुम्ही आमदार दिलीप सोपलांना भेटायला जातच आहात, तर रस्तामार्गे बार्शीत दाखल झालात, हा रस्ता दुरूस्त केल्याचं श्रेय आपल्याला मिळेल.
ता.क.
फेसबुकवर बरंच त्रोटक लिहिलंय… खरं तर रात्रीच बार्शी-मुंबई व्हाया कुर्डूवाडी हा प्रवास केल्यामुळे तुम्हाला पत्र लिहायचं या प्रवासातच ठरवलं होतं. कारण कुर्डूवाडीपर्यंतचा प्रवास हा ब्रह्मांड आठवणारा असतो.
आता तुम्ही उपमुख्यमंत्री असल्यामुळे हेलिकॉप्टरनेच बार्शीत येणार, त्याला पर्याय नाही, पण आपल्या अधिकाऱ्यांना मात्र राज्य मार्गावरूनच येण्याचे आदेश द्या, त्यांना तरी किमान परिस्थितीचं गांभिर्य येईल.