एकविसाव्या शतकाचं पहिलं दशकही संपलं

आज 31 डिसेंबर. 1 जानेवारी 2010 ला सुरू झालेलं वर्ष आज संपणार. फक्त वर्षच नाही तर 1 जानेवारी 2001 ला सुरू झालेलं दशकही आजच संपत आहे. हे दशक अनेक अर्थांनी महत्वाचं आहे, कारण हे एकविसाव्या शतकातील पहिलं दशक.

आपल्याकडे एकविसावं दशक सुरू होण्यापूर्वी त्याविषयी बरीच उत्सुकता होती, पण नवं शतक सुरू होण्यापूर्वी सर्वात जास्त बोलबाला होता तो Y2K चा, पण त्याची पुढे काहीच चर्चा झाली नाही. कॅलेंडरवरचं महिन्याचं पान सहजपणे पलटावं तसं प्रत्येक महिन्याप्रमाणे प्रत्येक वर्ष सरत गेलंय. प्रत्येक वर्षाच्या शेवटी वर्षभरातल्या ठळक घटनांची सालाबादप्रमाणे उजळणीही केली गेली. सर्व काही सराईतपणे…

आणि आता या नव्या शतकातलं पहिलं दशकही संपलं, उद्यापासून नवं वर्ष, नवं दशक सुरू होईल.

सरलेल्या वर्षाप्रमाणेच अनेकांनी, म्हणजे काहींनी व्यक्तिशः तर काही प्रसारमाध्यमांनी, संस्थांनी आणि वृत्तपत्रे-चॅनेलांनी फक्त वर्षभरातल्याच नव्हे तर दशकातल्या लक्षवेधी घटनांचा आढावा घेतलाय. त्याची उजळणी पाहताना-वाचताना फक्त घटना-घडामोडींचा उल्लेख एवढ्यापुरत्याच ही उजळणी मर्यादित राहते.

या दशकाचं, त्याने सामान्य माणसाच्या जगण्या-मरण्यावर केलेल्या परिणामाचं, या दशकात तंत्रज्ञानाच्या वेगाने आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यान् कोपऱ्यावर टाकलेल्या प्रभावाचं दणकट डॉक्युमेटेंशन अजून तयार झालेलं नाही. ना व्हिज्युअल्समध्ये ना प्रिंटमध्ये… काहीजणांचे काही प्रकल्प अजून पाईपलाईनमध्ये असतील, पण त्याची अजून फारशी चर्चा झालेली नाही, त्यांना घिसाडघाईने काही करण्याची इच्छा नसावी,

या शतकातल्या पहिल्या दहा वर्षात सर्वात महत्वाचा म्हणजे किमान आपल्याकडे आलेला तरी तंत्रज्ञानाचा शोध म्हणून मोबाईल फोनकडे पहावं लागेल. तशी त्याची सुरूवात 2000 सालाच्या आधीच आपल्याकडे सुरू झालेली, पण सुरवातीच्या काळात काही मोजक्या हातात, असलेला मोबाईल हे दशक संपेस्तोवर प्रत्येक हातात पोहोचलाय, किंबहुना दोन्ही हातात दोन आणि शिवाय खिशात एक असाही मोबाईलचा प्रवास झालाय.

मोबाईल या अतिशय छोट्या, हातात मावणाऱ्या कम्युनिकेशन गॅझेटने माणसा-माणसांमधलं अंतरच संपवून टाकलंय. मोबाईलने माणसांच्या दैनंदिन सवयीवर जे वेगवेगळे परिणाम केले, त्याची साधी यादी बनवायची तर बरीच लांब होईल. म्हणजे मोबाईल आपल्याकडे रूळायच्या आधी अलार्म लावण्यासाठी आपल्याकडे गजराचं घड्याळ असायचं, आता ती गरज मोबाईलनेच पूर्ण केलीय. त्यानंतर हिशेबासाठी कॅल्क्युलेटर वेगळं ठेवण्याची गरज मोबाईलने संपुष्टात आणली. एवढंच नाही तर आता मोबाईल फोनच्या 2G आणि 3G मुळे तर फक्त दोन व्यक्तीमध्ये संभाषणासाठी मोबाईल वापरायचा म्हणजे मागासलेपणा समजण्यात येऊ लागलाय.

फार पूर्वी नाही, 2000 सालाच्या दोनेक वर्षेच अगोदर तरूण पोरंपोरी, शाळा-कॉलेजाच्या सुट्टीत पुण्याहून आपापल्या गावी जायची तेव्हा त्यांच्या कानाला वॉकमन लावलेला असायचा. हा छोटा पोर्टेबल कॅसेट प्लेअर. त्याची सर्वाधिक पसंती प्रवासातच असायची. नंतर शाळा-कॉलेजात जातानाही वॉकमन लागायला लागला. सोनीने त्यांचा वॉकमन अधिकृतपणे याचवर्षी रिटायर केला असला तरी आपण सर्वांनी त्याला केव्हाच अडगळीत टाकून दिलंय, कारण वॉकमनची गरज आता आपल्या हातातल्या मोबाईलने पूर्ण केलीय.

पिकनिक किंवा सहलीला जाताना, रोलचे कॅमेरे आपल्या सामानातला एक अत्यावशक घटक होता. पण मोबाईलमधल्या कॅमेऱ्याने त्याची सुट्टी कून टाकली. यामुळे अशा पिकनिकच्या किंवा देवस्थानाच्या ठिकाणी कॅमेरा रोल, पेन्सिल सेल आणि कॅमेरे भाड्याने देणाऱ्यांची दुकाने थाटलेली असायची, आता ही दुकाने कुठेच दिसत नाहीत, पण याही दशकात तंत्रज्ञानाच्या पलिकडचं असं आश्चर्य नमूद करायचं म्हणजे आपल्याकडच्या अनेक देवस्थानाची गर्दी मात्र चांगलीच वाढलीय, त्यामुळे कॅमेरा रोल, पेन्सिल सेल यांच्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनी नवी दुकाने थाटलीत. भाविकांच्या गर्दीमुळे ही दुकानेही तुफान चालतात.

मोबाईलच्या प्रभावामुळे आपलं लिखाणही बरंच कमी झालंय, कारण निरोप किंवा पत्र लिहिण्याचं तर आता अडगळीला जाऊन पडलंय. गेल्या कित्येक वर्षात मला पन्नास पैश्याचं पत्र लिहिल्याचं आठवत नाही. आता त्याची किंमत पन्नास पैसेच आहे की नाही तेही ठाऊक नाही, 2000 च्या सुरवातीला याच पोस्टकार्डांची किंमत फक्त पंधरा पैसे होती, त्यानंतर पंचवीस आणि पन्नास कधी झाली ते लक्षातही आलं नाही कारण पोस्टातून पत्र आणलं कधी शेवटचं तेच आठवत नाही. नाही म्हणायला रेव्हेन्यू स्टॅम्प आणायला पोस्टात जावं लागतं, तेवढीच काय ती पोस्टाची वारी, पण रेव्हेन्यू तिकीटंही फार पूर्वीपासूनच पान टपऱ्यांवर मिळायला लागलीत.

मोबाईलच्या आगमनाने आणि सर्वसामान्यांना त्याची सेवा आणि हार्डवेअर परवडेल अशा किमतीत उपलब्ध होण्यामुळे पोस्टाची पत्रे, वॉकमन किंवा गजराचं घड्याळ जसं अडगळीत गेलंय, तसे काही चांगले बदल म्हणजे रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण झाल्यात. म्हणजे मोबाईल दुरूस्ती, विक्री, मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, त्यांचे रिटेलिंग एजंट गावोगावी आहेत, तसंच शहरात त्यांचे कॉलसेंटर्स असं बरंच काही…

मोबाईलवर आधारित उद्योगांची एक मोठी साखळीच आहे, मोबाईलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कव्हर्सपासून (मुंबईत लोकलमध्ये किंवा स्टेशनवर पाच रूपयांना प्लास्टिकचं वॉटरप्रूफ कव्हर मिळतं शिवाय जास्त पैसे असतील तर पारदर्शक प्लास्टिक किंला लेटरची कव्हर्सही मिळतात) गळ्यात अडकवण्याच्या लेसपर्यंत…

पुन्हा वेगवेगळी गाणी, रिंगटोन, वॉलपेपर्स, फोटो, व्हिडिओ क्लिप यांची उलाढाल तर कोट्यवधी रूपयांची आहे… हा सगळा पैसा सिस्टिममध्ये येतोच, त्याचा फायदा…

मोबाईलच्या या यत्र तत्र सर्वत्र व्याप्तीमुळेच त्याचं व्यावसायिक महत्व नव्याने अधोरेखित झालंय. म्हणजे बल्क एसएमएसच्या माध्यमातून होणाऱ्या जाहिराती… जाहिरातीची जेवढी म्हणून काही माध्यमे आहेत, त्या सर्वांची पोहोच मर्यादित आणि अंदाजपंचे असते, पण एसएमएसमार्फत मिळालेला संदेश वाचला जातोच, जातो.. काही शिव्या देत का असेना पण मोबाईल धारक तो जाहिरात वाचतो नक्कीच… इतकं खात्रीचं हे माध्यम… बल्क एसएमएसचा प्रभाव आणि त्यातली कॉर्पोरेट उलाढाल एवढी प्रचंड आहे की अयोध्या निकालाच्या काळात सांप्रदायिक तेढ वाढू नये म्हणून अशा बल्क मेसेजिंगवर सरसकट बंदी घालण्यात आली होती.

आता 3G च्या आगमनानंतर एकविसाव्या शतकातल्या मोबाईलसारख्याच वेगाने दशांगुळे व्यापून उरलेली टीव्ही चॅनेल्स सर्वसामान्य प्रेक्षकांच्या चक्क हातातच प्रकट होणार आहेत. टीव्ही वाहिन्या या दशकात सर्वाधिक वाढल्या. आपल्या मराठीपुरतंच बोलायचं तर 2000 साली इनमीन तीन चॅनल्स होती, त्यातलं एक सरकारी… काही महिन्यांमध्येच त्यातलं एक बंदही पडलं, पण आता फक्त मराठी चॅनेल्सची संख्या दहाच्या घरात आहे, त्यामध्ये फक्त बातम्यांची तीन चॅनेल आहेत तर ठराविक वेळाने बातम्या पुरवणारी चार चॅनेल्स आहेत, त्यापैकी एक सरकारी… आता 3G टेक्नॉलॉजीमुळे ही सर्व चॅनेल्सही मोबाईल सेटवर पाहायला मिळतील.

याच दशकात टीव्ही चॅनेल्ससह वृत्तपत्रांनाही इंटरनेट या नव्या जोडीदाराची आवश्यकता वाटली, आणि अनेक वृत्तपत्रे तसेच टीव्ही चॅनेल्स इंटरनेटवर उपलब्ध झाली… त्यांचाही आता स्वतंत्र व्यवसाय झालाय. आता तर असंही म्हटलं जातंय की ज्या वृत्तपत्राचं किंवा चॅनेलचं आगामी काळात मोबाईल व्हर्जन उपलब्ध होणार नाही, त्यांना आपल्या आस्तित्वासाठी झगडावं लागेल, कारण प्रत्यक्ष टीव्ही होम्सपेक्षा मोबाईल असलेल्या हातांची संख्या कितीतरी पटीने अधिक असेल. आणि तोच खरा वाचक-प्रेक्षक असेल…

तसंच बँकाचंही आहे, आता बहुतेक सर्व बँकांची अॅप्लिकेशन्स मोबाईलवर उपलब्ध आहेत, त्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून बँकांचे सर्वच व्यवहार करता येतात, आता तर शेअर ट्रेडिंगही मोबाईलवर करता येऊ लागलंय.

एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दहा वर्षांनी आपल्या आयुष्यावर सर्वाधिक प्रयत्न केलेल्या शोधाचा, तंत्रज्ञानाचा धावता आढावा घ्यायचा प्रयत्न हा होता, मोबाईलचे काही दुष्परिणामही समोर आलेत, अनेक अश्लील एमएमएसची प्रकरणं हा त्यातलाच एक प्रकार… पण त्यांची त्रोटक नोंद अनाठायी होईल. उलट अनेक गुन्ह्यांचा शोध घेताना पोलीस यंत्रणा मोबाईल, किंवा त्यासंदर्भातला डेटाकडे हा एक महत्वाचा दुवा म्हणूनच पाहते. इतका या मोबाईलचा संचार सर्वव्यापी झालाय.

मोबाईल ही एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाची फक्त एक चुणूकच आहे. आणखी नव्वद वर्षांनी हे शतक संपेल, म्हणजे या पहिल्या दशकासारखी आणखी नऊ दशके… तेव्हा कुठपर्यंत पोहचेल तंत्रज्ञानाचा हा वेग…

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: