सीने में जलन… आँखो में तुफां सा क्यूं हैं

भारतीय साहित्य जगतात शहरयार हे एक असं नाव आहे, ज्याची उर्दू कवितेच्या-शायरीच्या क्षेत्रातली सुरूवात साठच्या दशकात झाली. साठोत्तरी दशक म्हणजे सर्वच अर्थाने भारतीय साहित्यात नवनिर्माणाचं दशक आहे, मग मराठी असो की हिंदी किंवा उर्दू…

साठच्या दशकाच्या सुरवातीला उर्दू शायरीच्या क्षेत्रात दोन प्रवाह होते. दोघांचे मार्ग वेगवेगळे आणि ध्येयही.. एक प्रवाह होता, जो बंडखोरांचा म्हणजे परंपरेला पूर्णपणे नाकारून पुढे जाणाऱ्यांचा.. पूर्णपणे नवीन विचारांचा… जुन्याला टाकाऊ मानणारांचा तर दुसरा प्रवाह होता अभिव्यक्ती, अनुभव आणि मांडणीतल्या नवेपणावर विश्वास ठेवणारा.. त्याचवेळी परंपरेशी नाळ कायम ठेवणारा असा…

शहरयार यांनी आपल्या कवितेला दुसऱ्या प्रवाहासोबत ठेवलं, आणि मांडणी आणि सादरीकरणातला नवेपणा प्राणपणाने जपला.. त्यांच्या मांडणीतला नवेपणा आला होता त्यांच्या सामाजिक जाणिवेतून, प्रगल्भ वैचारिक आणि विज्ञानवादी भूमिकेतून.. शहरयार या मताचे होते की या वैज्ञानिक दृष्टीकोनाशिवाय कुठलंही रचनात्मक नवनिर्माण जगात होऊ शकणार नाही. म्हणजेच ते काळाच्या, नव्या विचारांच्या सोबत होते. या पायावरच त्यांनी आपल्या एकांतातून जगाच्या शांततेचं आणि स्वप्नांची पूर्तता करायला लागले. यामध्ये सर्वात मोठा वाटा त्यांच्या गंगा-जमुनी सुसंस्कृततेचाही आहे. या सुसंस्कृतेतशी असलेली आपली नाळ त्यांनी कधीही तुटू दिलेली नाही.

कुँवर अखलाख मोहम्मद खाँ उर्फ शहरयार यांचा जन्म 6 जून 1936 … त्याचं जन्मगाव बरेली जिल्ह्यातलं आँवला… तसं त्याचं मूळगाव चौढेरा बन्नेशरीफ.. ते उत्तर प्रदेशातल्या बुलंद शहरमध्ये येतं. त्याचे वडिल पोलीस अधिकारी होते. त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. त्यामुळे त्याच्या प्राथमिक शिक्षणाचे काही दिवस वडिलांची पोस्टिंग असलेल्या ठिकाणी झालं. त्यानंतर हरदोईमध्ये काही वर्षे घातल्यानंतर त्यांना 1948 मध्ये अलीगढला पाठवण्यात आलं. त्यावेळी त्यांना तिथल्या सरकारी शाळेत प्रवेश मिळाला नाही. म्हणून त्यांना सिटी स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा लागला.

आजवरचं त्याचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं होतं, मात्र सरकारी शाळेत प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांना उर्दू माध्यमातून शिकावं लागलं. त्यानंतर शालेय शिक्षण पूर्ण करून ते अलीगढ मुस्लीम विद्यापीठात पोहचले… आणि तिथलेच झाले.

कुँवर अखलाक मोहम्मद खाँ शरीराने धष्टपुष्ट… थोडक्यात खात्या-पित्या घरचे…तसंच खेळात नैपुण्य असलेले.. त्यामुळेच त्यांच्या वडिलांची इच्छा होती, की अखलाकने आपल्याप्रमाणेच पोलिसांमध्ये भरती व्हावं, त्यासाठी त्यांच्या वडिलांनी बरेच प्रयत्न केले. पोलिसांत अधिकारी म्हणून भरती होण्यसाठीचा फॉर्मही अखलाकला आणून दिला, पण काहीतरी खोटं सांगून अखलाकने हा फॉर्म भरलाच नाही.. कारण त्यांना शहरयार बनायचं होतं. त्यामुळे वडिलाचं त्यांना पोलीस अधिकारी बनवण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं.

त्यांनी 1961 ला अलीगढ मुस्लीम विद्यापाठात उर्दू विषयात एम.ए. केलं. खरं तर त्यांना मानसशास्त्रातून एम.ए. करायचं होतं. त्यासाठी त्यांनी एक वर्ष वाया घालवलं. या प्रयत्नात त्यांचे वर्गमित्र आणि प्रसिद्ध साहित्यिक राही मासूम रझा पुढे निघून गेले.

विद्यार्थी जीवनातच त्यांच्या काव्य प्रतिभेला धुमारे फुटायला सरूवात झाली होती. त्यांनी ‘अंजुमने-ए-उर्दू-मुअल्ला’ या साहित्यिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांना ‘अलीगढ मॅगझीन’चं संपादक बनवण्यात आलं. मग त्यांच्या प्रतिभेला त्यांनी कधीच बांध घातला नाही. हिंदी आणि उर्दू यांच्यातली भिंत त्यांना खूपच धूसर अशी वाटली, त्यांच्यामते फक्त लिपीचाच काय तो फरक… 1959 मध्ये त्यांनी ‘गालिब’ नावाच्या पत्रिकेचं संपादन-प्रकाशन सुरू केलं. मात्र त्याचे फक्त पाचच अंक प्रकाशित झाले. त्यांनंतर त्यांनी मुगनी तबस्सुम यांच्यासोबत ‘शेर-ओ-हिकमत’ ही काव्य पत्रिका सुरू केली. त्यावेळच्या साहित्यिक विश्वात त्यांच्या या उपक्रमाचं चांगलं स्वागत झालं, त्यांच्या या साहित्यिक पत्रिकेला प्रतिसादही चांगला मिळाला. त्यानंतर 1961 ते 1966 पर्यंत ते ‘हमारी जुबान’शी संबंधित राहिले.

याच काळात अलीगढ मध्ये इतिहासकार मोहम्मद हबीब, प्रो.नुरूल हसन, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. आले मोहम्मद सरूर आणि प्रो. मोहम्मद अलीम मुस्लीम तरूणांची एक नवीन पिढी घडवत होते. हे तरूण नव्या युगाची कास धरून मुस्लीम समाजात एक नवी पुरोगामी पिढी तयार करेल असा या ज्येष्ठ नेत्यांना विश्वास होता. हे सर्व शिक्षण आणि विचारांच्या अदान-प्रदानातून शक्य होणार होतं. दुसऱ्या बाजूला प्रसिद्ध गीतकार काजी अब्दुस सत्तार, शायर आणि लेखक डॉ. राही मासूम रझा, जावेद कमाल, डॉ. कुँवरपाल सिंह आणि मुगनी तबस्सुम, ही मंडळी ज्येष्ठांकडून मिळालेले आशीर्वाद घेऊन पुढे जात होती.

सन 1966 मध्ये शहरयार अलीगढ मुस्लीम विद्यापीठात उर्दू विभागात लेक्चरर म्हणून नियुक्त झाले. त्यापूर्वीच म्हणजे 1965 मध्ये त्यांचा पहिला कविता संग्रह इस्मे-आजम प्रकाशित झाला होता. त्यानंतर ते 1983 मध्ये रीडर आणि 1987 मध्ये अलीगढ मुस्लीम विद्यापीठातच प्रोफेसर झाले. प्रोफेसरपदावर बढती मिळाल्यानंतर अलीगढ मुस्लीम विद्यापीठाची वैचारिक पत्रिका ‘फिक्र-ओ-नजर’ च्या संपादनाची जबाबदारी सोपवण्यात आली. आपल्या संपादन कारकिर्दीत शहरयार यांनी फिक्र-ओ-नजर मधून मौ.अबुल कलाम आझाद, हाली शिबली, नजीर अहमद आणि सर सैय्यद यांच्यावर विशेषांक काढले. हे विशेषांक आजही एक संदर्भ ग्रंथ म्हणून पाहिले जातात.

सन 1969 मध्ये त्यांचा दुसरा कविता संग्रह सातवाँ दर प्रकाशित झाला. त्यानंतर 1978 मध्ये हिज्र के मौसम, त्यानंतर ख्वाब का दर बंद हैं हा कविता संग्रह 1985 मध्ये आला, ख्वाब का दर बंद हैं या कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानंतर 1995 साली नींद की किरचे प्रकाशित झाला. शहरयार यांची कविता आजही थांबलेली नाही. मुळात उर्दूमध्ये लिहिणाऱ्या शहरयार याचं सर्व लिखाण आता देवनागरी लिपीतही उपलब्ध आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणाला हिंदीभाषी वाचकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळाला.

शहरयार यांनी आपल्या आयुष्याचा सर्वाधिक काळ अलीगढमध्ये घालवलाय. याच शहरात त्यांची काव्य प्रतिभा फुलली, बहरली. याच शहराने हिंदी आणि उर्दूतले अनेक लेखक घडवले आहेत. तसं पाहिलं तर याच शहरावर धर्मांधतेचा, प्रतिगामित्वाचाही एक डाग अनेकांनी लावलाय. पण अलीगढ म्हणजे काही फक्त प्रतिगामित्व नाही. इथले लोक सुसंस्कृत आणि सभ्य आहेत. त्याचेच प्रतिक शहरयार आहेत. हे शहर म्हणजे भारताच्या सर्वसमावेशक संस्कृतीचं एक प्रतिक आहे. कारण या शहरात उर्दू आणि हिंदी यांच्यात कसलीही भिंत नाही. हिंदी भाषी असो की उर्दू भाषी कोणताही लेखक दुसऱ्या भाषेतल्या लेखकाला हीन लेखत नाही. उलट त्यातल्या बऱ्यावाईटावर चर्चा करतात. या सामंजस्याचं श्रेय शहरयार, काजी अब्दुस सत्तार आणि डॉ. कुँवर पाल सिंह यांच्या पीढीला जातं. कारण आजच्या साहित्यिक-सामाजिक सौहार्द्राचा पाया त्यांच्या पिढीनेच घातलाय. हे सर्व ज्येष्ठ साहित्यिक संगम नावाची एक साहित्यिक संस्था चालवतात, त्यामध्ये अनेक जुने-नवे पुरोगामी लेखक सहभागी होतात.

शहरयार यांनी आपल्या कवितेला आपल्या आयुष्यापासून कधी विभक्त करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांचा हा नेहमीच प्रयत्न असतो की आपले विचार आपलं साहित्यिक वजन कधी घरच्या मंडळीवर कुंटुंबावर लादलं जाणार नाही. एक वडील म्हणून कधीही त्यांनी आपल्या इच्छा आपल्या मुलांवर लादल्या नाहीत. त्यांना वाटायचं की आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं, आपलं लिखाण ते पहिल्यांदा आपल्या मुलांनाच पहिल्यांदा द्यायचे. बऱ्याचदा ते आपल्या मुलांसाठी छोट्या छोट्या गोष्टी-कथा लिहायचे, त्यामागे उद्देश होता की मुलांना वाचनाची गोडी लागावी. आपली गीते आणि गझलाही ते मुलांना वाचायला द्यायचे, कधी कधी मुलांसाठीच लिहायचे. आज त्यांची तिन्ही मुलं (दोन मुले एक मुलगी) शिकून सवरून आपापल्या कामाधंद्याला लागलीत.

पण या प्रचंड मनस्वी आणि कनवाळू असलेल्या प्रतिभावंत साहित्यिकाला या वयात आपल्या जीवनाच्या या टप्प्यावर मात्र एकाकी राहावं लागतंय. कारण बेगम नजमा शहरयार आणि शहरयार एकत्र राहात नाहीत.

हा एक विचित्र एकटेपणा आहे. प्रचंड त्रासिकही आहे. हा एकटेपणा ते दोघेही पण वेगवेगळ्या घरात सहन करत आहेत. आपल्या एका कवितेतून त्यांनी ही एकटेपणाची वेदना व्यक्त केलीय.

कवितेचं नाव आहे : नजमा के नाम
क्या सोचती हो !
दीवारे फ़रामोशी से उधर क्या देखती हो !
आइन-ए-ख्वाब में आने वाले लम्हों में मंज़र देखो।
आँगन में पुराने नीम के साये में
भइयू के जहाज़ में बैठी हुई नन्हीं चिड़िया
क्यों उड़ती नहीं !
जंगल की तरफ जाने वाली
वह एक अकेली पगडंडी क्यों मुड़ती नहीं !
टूटी ज़ंज़ीर सदाओं की क्यों जुड़ती नहीं !
एक सुर्ख़ ग़ुलाब लगा लो अपने जूड़े में और फिर सोचो !

बेगम शहरयार यांना समजू शकली नाही की शहरयार बेगमना समजून घेऊ शकले नाहीत, हे फक्त ते दोघेच सांगू शकतील. बेगमला एक लाल गुलाबाचं फूल अलीगढ मिळालं नाही की शहरयार यांना ते सापडलं नाही.. माहिती नाही, पण जेव्हा जेव्हा अलीगढमध्ये मैत्रीचा विषय निघतो तेव्हा शहरयार यांचं उदाहरण एक आदर्श म्हणून दिलं जातं. एक जीवलग अप्रतिम दोस्त…

जसं सगळीकडेच पाहायला मिळतं, तसंच शहरयार यांच्याविषयी अलीगड मुस्मीम विद्यापीठात त्यांच्याविषयी कुचाळक्या करणारे त्यांचे निंदकही कमी नाहीत. त्यांच्याविषयी अनेक छोट्या छोट्या तक्रारीही केल्या जातात. या तक्रारी कशा स्वरूपाच्या तर ते कुणाही धड दोन शब्द बोलत नाहीत. फार कुणाशी मिसळत नाहीत. आपल्या आपल्यातच मग्न असतात. कधी कुणाच्या अध्यात नाही की कधी कुणाच्या मध्यात नाही. जर कुठं काही भांडण सुरू असेल त्यात न डोकावता, बाजूनं निघून जाणारे अशी त्यांची ख्याती आहे. आपला जीवन प्रवास किंवा आत्मकथा लिहायची तर शहरयार म्हणतात की आत्मचरित्र लिहिण्यासाठी एक धाडस लागतं. एक बहादुरी लागते. आणि ते मोकळ्या मनाने मान्य करतात की हे धाडस त्यांच्याकडे नाही.

हम में जुर्रत की कमी कल की तरह आज भी है
तिश्नगी किसके लबों पर तुझे तहरीर करूँ

साहित्याच्या या क्षेत्रात या टप्प्यावर पोहोचूनही त्यांच्यातली नम्रता अबाधित आहे. ते कधीही अविर्भावात बोलत नाहीत. आपलं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी आग्रह धरत नाही. कुणाविषयीही रोष नाही, राग नाही. म्हणजे ते काही सांगतच, बोलतच नाहीत असंही नाही. त्यांना जे काही सांगायचं असतं ते शायरीच्या माध्यमातून सांगतात. तेच त्यांचा हातखंडा असलेलं माध्यम आहे. त्यांची मतं साफ आणि स्पष्ट आहेत. त्यामुळेच त्यांना कुणाची भीडभाड नसते. त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोनावर विश्वास पहिल्याप्रमाणेच दृढ आहे. पण त्यांना साचेबद्धता मान्य नाही. म्हणून पुरोगामित्वावर विश्वास ठेवतानाच स्वांतत्र्याच्या साठ वर्षात जे व्हायला हवं होतं, ते झालं नसल्याचं खंतही त्यांना आहे.

साधारणपणे विद्यापीठातून रिटायर होताना अनेक साहित्यिक आपल्या प्रसिद्धीचा, साहित्यिक वजनाचा वापर करून मुदतवाढ घेण्याचा प्रयत्न करतात, मात्र निवृत्त होण्याच्या नियमित तारखेला त्यांनी कसल्याही मुदतवाढीची अपेक्षा न ठेवता निवृत्ती स्वीकारली. 1996 साली ते अलीगढ मुस्लीम विद्यापीठातून उर्दू विभाग प्रमुख पदावरून रिटायर झाले.

शहरयार नेहमीच मानवी मूल्यांना सर्वात वरचं स्थान देतात. ते म्हणतात, इतिहासातून हे स्पष्ट होतेयं की लोकांना साहित्यामुळे नाही तर मानवी मूल्यांमुळेच त्यांना उन्नतीचा मार्ग सापडलाय. त्यांना असंही वाटतं की लेखकाच्या सृजनशक्तीला कधीही कुठल्याही भाषेच्या सीमेत बंद करता येणार नाही. हिंदी आणि उर्दू याबाबतत तर त्यांची मते ठाम आहेत. त्यांच्या मते या दोन्ही भाषांमध्ये फरक काय तर तो फक्त लिपीचा… दोन्ही भाषेच्या साहित्यातले घटक आणि समस्या जवळ जवळ सारख्याच आहेत.

शायरी असो की कथा, ते सांगतात मनापासून दणकट लिहा, आपण आधी जे लिहिलंय, त्याच्याही पुढे जाणारं सातत्याने लिहायला हवं, यामुळे साहित्य साचून राहात नाही. मग ते लिखाण परिपूर्ण आणि प्रभावी होईल. असे काही अपवादात्मक उपदेश, सल्ले सोडले तर ते कधी साहित्यविषयक जाहीर कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. कारण त्यांना या भाऊगर्दीत स्वतःला हरवून टाकायचं नाही. ते नेहमी म्हणतात, जीवनाची स्वतःची अशी एक जगण्याची पद्धत असते, ते त्याच पद्धतीने जगत जातं. जे तुम्ही करू शकता, ते तुम्हाला माहिती नसतं आणि जे आपल्याला करायचंच नसतं, त्याविषयी मात्र तम्हाला माहिती असते. दणकट साध्य आपल्यासमोर असायला पाहिजे आणि त्यासाठी साधनही तेवढ्याच ताकदीचं हवं, या अव्यक्त साधनाचा शोध म्हणजेच त्यांच्या साहित्यिक प्रवास किंवा त्यांची कविता आहे.

शहरयार यांना आपली संस्कृती, इतिहास, भाषा आणि धर्माविषयी बरीच आस्था आहे, पण धर्म त्यांच्यासाठी संस्कृतीला समजून घेण्याचं एक माध्यम आहे. कारण संस्कृती आणि समाज यांची ओळख पटल्याशिवाय शायरी करताच येणार नाही, कारण सृजनाही प्रक्रिया त्याशिवाय अपूर्णच राहील. जीवनाचं भागधेय शोधणं सर्वात कर्म कठीण असं आहे, संबंध आयुष्य सरत आलं तरी ईप्सित साध्य होत नाही. शोध पूर्ण होत नाही, म्हणूनच ते गीत किंवा कविता फक्त लिहितच नाहीत, तर त्यासोबत जगतात. जे शब्द स्वतःचा अर्थ हरवून बसलेत, त्याचा ते वापरच करत नाहीत. जीवनाचं अवघड असं तत्वज्ञान ते सोप्यात सोप्या शब्दात मांडायचा प्रयत्न करतात.

म्हणूनच कदाचित ते वाचता वाचता थांबत असावेत, मोठा पॉज घेत असावेत, त्यांना थांबावं लागतं कारण वाचण्यातला अडथळा म्हणून नाही तर विचार करण्यासाठी विचारांची श्रृखला अबाधित ठेवण्यासाठी त्यांना मध्ये मध्ये थांबून विचार करावा लागतो. साहित्याच्या गडबड-गोंगाटापासून दूर अशी एक स्तब्धता त्यांच्या कवितेत आहे. म्हणूनच त्यांच्या लेखनात नेहमी सांस्कृतिक प्रतिमा उमटतात, या प्रतिमा रस्त्यातून जाताना वाटेत मागे जाणाऱ्या झाडांप्रमाणे झर्रर्रर्रर्रर्रर्रकण जात नाहीत तर ते प्रवासात कायम तुमच्या सोबत राहतात. तुमच्या सहप्रवासी बनून…

शहरयार यांच्या लेखनात एक स्तब्धता आहे, असं मघाशीच मी सांगितलं. पण ही स्तब्धता कृत्रिम नसून त्यांची एक अभिव्यक्तीच आहे. या विचारमग्न स्तब्धतेचे स्वर जेव्हा मनाच्या बैचेन कोपऱ्यात पसरतात, तेव्हा ते अगदी आतलं आतलं असं व्यक्त करतात, कसलीही भीडभाड न ठेवता. मग ती इतिहासाची पाने असोत की व्यक्तिगत डायरीची.. म्हणजे आपल्यातली आपल्यात, बाहेरच्या जगाला त्याची काही खबरबातच नसते. सृजनाच्या या प्रक्रियेची ही खास अशी शहरयार य़ांची स्टाईल, म्हणूनच मला शहरयार यांची कविता एकाकी आणि आत्ममग्न असूनही तक्रारखोर वाटत नाही. तर एक प्रगल्भ सांस्कृतिक वारसा जपणारी वाटते. ही प्रगल्भता फैज आणि फिराक यांच्या परंपरेशी नातं सांगणारी आहे. फैज यांचा स्पष्टवक्तेपणा आणि फिराक यांची प्रगल्भता यांचा समन्वय शहरयार यांच्या कवितेत झालाय. असं असलं तरी ती कविता फैज आणि फिराक यांच्यापेक्षाही थोडी वेगळीच आहे, त्यांची नाळ तिथे जाऊन पोहोचते एवढंच…

शहरयार याचं आणखी एक वैशिष्ट्य असं की त्यांचं सृजन हे अतिशय आत्मकेंद्री आणि व्यक्तिनिष्ट आहे, मात्र तुम्ही त्यात उतरला की तुम्हाला त्यात हळू हळू आपला आणि आपल्या काळाचा चेहरा दिसू लागतो. कधी कधी भीषणही आणि विषण्णही असतो. म्हणून मायानगरी मुंबईचं अतिशय चपखल आणि समर्पक वर्णन करण्यासाठी ते सीने में जलन, आँखोंमें तुफाँ सा क्यों हैं, असं म्हणतात, जे गेल्या तीसेक वर्षानंतरही आज तितकंच ताजं टवटवीत वाटतं. आणि प्रत्येकाची त्याला दाद मिळते… यामुळेच त्यांची कविता कधी बेचव किंवा शिळी होत नाही. त्यांची कविता म्हणजे बारीक घसरत्या वाळूसारखी, हातात घेता तेव्हा बरंच काही साठवल्यासारखं आतात आल्या सारखं वाटतं पण लगेच हाताच्या सांधीतून काही कळायच्या आत हळूवारपणे ते सटकूनही जातं, अतिशय प्रवाही असं.. ना रेशमी मुलायम तलम नाही की जाडं भरडं सुती…फक्त प्रवाही… शहरयार यांची कविता फक्त अनुभुतीचा भाग आहे, त्या पलिकडे काहीच नाही.

मी मनाचा,विचारविश्वाचा गोंधळ उडालेला असतो, विमनस्क झालेलो असतो अशा वेळी माझ्या आईच्या चित्राकडे पाहात राहतो, किंवा मीराबाईचे अभंग आठवतो, किंवा केदारनाथ अग्रवाल यांच्या कवितेच्या ओळी गुणगुणण्याचा प्रयत्न करतो किंवा नागार्जून यांच्या लिखाणासोबत युद्धभूमीवर जातो किंवा दुष्यंत यांच्या ओळींबरोबर भीषण वर्तमानाच्या गल्ल्यान गल्ल्या धुंडाळत त्यातल्या कुरूप चेहऱ्यांना सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत राहतो… अगदी तसंच मी शहरयार यांच्या कवितेला आपल्या अडचणीच्या वेळी मित्राने पाठवलेल्या पत्रासारखा पाहतो.

शहरयार यांनी आपल्या गझलांसाठी कल्पनेतल्या विश्वाऐवजी जगण्याच्या वास्तवाचं भान दिलं. त्याचं एकच स्वप्न आहे, विश्वात शांतता, परस्पर सौहार्द्र, सुख, समाधान नांदायला हवं, डोळे आणि स्वप्न यांच्यामध्ये हा शायर शायरी करत जातो. तो पराभव मानायला तयारच होत नाही. हा पराभव न स्वीकारण्याचा हट्टच शहरयार यांना एक दणकट, भक्कम सृजनशील कवी बनवतो. त्यांनी आपल्या कवितेला कधी सरकारी प्रचाराचं माध्यम बनू दिलं नाही. तरीही समाजाची सकल मानव जातीच्या भवितव्याची चिंता ते आपल्या कवितेला देत राहतात. ही कलात्मकताच त्यांच्या कवितेला सर्वात जास्त आधुनिक आणि प्रगल्भ बनवते. काळाबरोबर चालायला मदत करते. म्हणूनतच त्यांचा कायम या वर्तमानाशी संघर्ष चाललेला असतो.

माना साहिल दूर बहुत है
माना दरिया है तूफानी
कश्ती पार नहीं होने की
आखिर कोशिश को करनी है

किंवा

जो जहाँ कदम जमाए रहे
क्या ख़बर कब ज़मीन चलने लगे

तुम्हारे शहर में कुछ भी हुआ नहीं है क्या
कि तुमने चीखों को सचमुच सुना नहीं है क्या
मैं इक ज़माने से हैरान हूँ कि हाकिम-ए-शहर
जो हो रहा है उसे देखता नहीं है क्या

शायराची ही तळमळ जीवघेणी आहे. या तळमळीनेच तो संपूर्ण व्यवस्थेला आव्हान देत राहतो, धक्के देत राहतो. पण निराश होत नाही, कधीही… स्वप्ने बघण्याचा हट्ट सोडत नाही, अजिबात… कारण त्याला आशा आहे की या वादळातही एक दिवा, एक ज्योत पेटवता येईल, कारण या वादळात, अंधारात दिवा पेटवण्याचीच तर गरज आहे… आणि ती अजून ती पेटवायची आहे.

आँधी की ज़द में शम्ए-तमन्ना जलाई जाए
जिस तरह भी हो लाज जुनूँ की बचाई जाए।

शहरयार यांच्या कवितेत यामुळेच एक विद्रोहही आहे, आणि आजच्या बिघडलेल्या वर्तमानावर भाष्य करण्यासाठी ते विनोदाचा, उपहासाचा आधार घेतात. कारण आताच्या समाजव्यवस्थेवर आसूड ओढायचे असतील तर उपहासाशिवाय दुसरं शस्त्र नाही. विद्रोह आणि विनोद त्यांच्या कवितेत हातात हात घालून जातात,

जो बुरा था कभी, वह हो गया अच्छा कैसे
वक्त के साथ मैं इस तेज़ी से बदला कैसे
…………..

तमाम शहर आग की लपेट में है
हजूर कब से मीठी नींद सो रहे हैं, भागिए।

अब और कुछ न देखिये, अब और कुछ न सोचिए
तमाम शहर भाग की लपेट में है, भागिए।
…………..

तेज़ हवा में जला दिल का दिया आज तक
ज़ीस्त से एक अहद था, पूरा किया आज तक।

सूरज का सफ़र खत्म हुआ रात न आई,
हिस्से में मेरे ख्वाबों की सौगात न आई !

यूँ डोर को हम वक्त की पकड़े तो हुए थे
इक बार मगर छूटी तो फिर हाथ न आई।

हर सिम्त नजर आती हैं बे-फ़स्ल जमीनें,
इस साल भी इस शहर में बरसात न आई।

– कमलेश्वर
कमलेश्वर हे शहरयार यांचे समकालीन, आणि एक चांगले मित्र. कमलेश्वर यांचा हिंदी साहित्यात एक दबदबा आहे, त्याचं कितने पाकिस्तान हे ही कादंबरी प्रचंड गाजली… त्याशिवाय अनेक हिंदी सिनेमांचं स्क्रीप्ट त्यांनी लिहिलं, त्यांची भाषाशैली अतिशय ओघवती, आता ते आपल्यात नाहीत. त्यांनी आपल्या मित्राचा, त्याच्या सृजनशीलतेचा आणि त्याच्या कवितेचा करून दिलेला हा परिचय… हा परिचय फक्त शहरयार यांच्या साहित्याचा नाही तर त्यांच्या माणूस म्हणून असण्याचाही आहे. हा परियच खरं तर एका शहरयार यांच्यावरील एका पुस्तकाची सुरूवात आहे. त्याचा हा माझ्या कुवतीप्रमाणे केलेला स्वैरानुवाद… यामध्ये मी मुद्दामच शहरयार यांच्या कवितांचा अनुवाद केलेला नाही, त्या हिंदी-उर्दूतून तशाच दिलेल्या आहेत.

– (अनुवाद : मेघराज पाटील)

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: