फेसबुकचा सातत्याने वापर करणारे नेटिझन आत्ममग्न, आत्मकेंद्री असतात, असा निष्कर्ष कॅनडातल्या यॉर्क विद्यापीठातल्या संशोधकांनी काढलाय. फक्त फेसबुकच नाही तर वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईटवर वेळ घालवणाऱ्या व्यक्ती किंवा नेटिझन हे आत्ममग्न आणि स्वतःच्या तसंच स्वतःच्या विचारांच्या सर्वाधिक प्रेमात पडलेले असतात, असाही निष्कर्ष या संशोधकांनी नोंदवलाय. यॉर्क युनिवर्सिटीतल्या या संशोधकांनी सोशल नेटवर्किंगच्या संदर्भात अगोदर असलेल्या गैरसमजांना बळकटी देण्याचा प्रयत्न करत एकच एक असा सार्वत्रिक निष्कर्ष काढण्याची घाई केलीय.
फेसबुक मित्राने या संशोधनाची लिंक टाकली, त्याचा माझ्या मगदुराप्रमाणे स्वैर अनुवाद आणि त्यामध्ये स्वतःची थोडीशी भर टाकण्याचा प्रयत्न..
आपल्याकडे पाश्चिमात्य विद्यापीठातलं, त्यातल्या त्यात युरोप-अमेरिकेचं संशोधन म्हटलं की काही तरी लय भारी म्हणून ते अनुकरण्याची एक पद्धत आहे, पण त्यांचं ते सर्व चांगलं असं म्हणण्यात काही अर्थच नाही..
सायबर स्पेस किंवा इंटरनेट जगत हे आपल्यापेक्षा काही तरी वेगळं, व्हर्च्युअल असं आपल्याकडे अजूनही समजलं जातं, प्रत्यक्षात इंटरनेटने ने आपल्या जगण्यात स्वतःसाठी स्पेस तयार केलीय. पूर्वी ईमेल अकाऊंट असणं ही एक खूप महत्वाची बाब समजली जायची, आता प्रत्येकाकडे एक तरी ईमेल अकाऊंट असतं तसंच मेल चेक करणं हे आपल्या नियमित दिनचर्चेचा भाग बनलाय. तसंच हल्ली प्रत्येक तरूणाला फेसबुक, ऑर्कूट, ट्विटर, गूगल बझ अशा ठिकाणी आपलं प्रोफाईल असावं असं वाटतं. किंबहुना हे त्याच्या नियमित जीवनशैलीचाच एक भाग आहे. त्यासाठीच ऑनलाईन नेटवर्किंग साईट्स सातत्याने परस्पर संवादाच्या नवनवीन युक्त्या शोधत असतात. म्हणून आता सोशल नेटवर्किंगच्या वापरकर्त्यांविषयी अशी सरसकट जनरल विधाने अभ्यास आणि संशोधनाच्या नावाखाली करणं फारसं योग्य नाही. कदाचित नवी पिढी आणि नव्या तंत्रज्ञानाशी आणि संपर्क साधनांशी असलेली त्यांची जवळीक यावर अन्याय करणारं ठरेल.
फेसबुकने सर्व नेटिझन्सना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. त्याचा वापर कुणी कसा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न… प्रत्येकाची मते वेगवेगळी, प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे… त्यामुळेच आपापल्या कुवतीप्रमाणेच प्रत्येकजण वेगवेगळ्या पोस्ट टाकील, व्हिडिओ अपलोड करेल, किंवा फोटो अपलोड करेल… प्रत्येकाचा प्राधान्यक्रम वेगवेगळा असणारच… आपापल्या मगदुराप्रमाणे जो तो त्याच्या दैनंदिन अनुभव विश्वाला आपल्या स्टेट्समध्ये शब्दबद्ध करेल, ते ही वेगवेगळ्या माध्यमातून, कधी कॉमेन्ट करून तर कधी एखादा चांगला व्हिडिओ किंवा फोटो अपलोड करून… हे ज्याच्या त्याच्यासाठी आपल्या दररोजच्या जगण्यावर केलेलं भाष्य असेल. आपापली अभिव्यक्ती असेल.. फेसबुक किंवा त्याच्यासारख्या अन्य सोशल नेटवर्किंग साईट्स हे फक्त एक माध्यम आहे… अभिव्यक्त होण्याचं.. फेसबुक हे तर फक्त साधन आपापल्या भावनांना व्यक्त करण्याचं… कधी या भावना व्यवसायाशी किंवा पेशाशी संबधित असतील तर कधी दररोजच्या कामाशी-कटकटीशी संबंधित तर कधी मित्र-मैत्रिणींशी संबंधित.
काही जण फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सचा आणखी वेगळ्या पद्धतीने वापर करतील, त्यांच्यासाठी ते फक्त व्यावसायिक अर्थाने संपर्कात राहण्याचं एक साधन असू शकेल, कारण हल्ली अनेक नोकऱ्या देणारे संभाव्य भरतीपूर्वी संबंधित उमेदवारांच्या सोशल नेटवर्किंग प्रोफाईलला भेट देऊन त्याच्याविषयीची माहिती जमा करतात, त्यातून संबंधित उमेदवाराविषयीचं मत तयार करतात. हा प्रकार अजून आपल्याकडे फार नसला तरी पाश्चिमात्य देशात ही एक नियमित एचआर प्रॅक्टिस समजली जाते.
फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सने सातत्याने वेगवेगळ्या संकल्पना राबवल्यानेच त्यांच्या वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ झालीय. कारण अगोदरच्या ऑरकुटच्या तुलनेत फेसबुकने वापरकर्त्यांना जास्त सुविधा आणि सुरक्षितता दिलीय. आपलं प्रोफाईल, कुणी कुणी पहायचं हे ही आपणच ठरवत असतो. त्यामुळे आपण काही मत व्यक्त केलं की ते जगात सर्वत्र पोहोचेल, असं सरसकट म्हणता येत नाही, तसंच आपल्या प्रत्येक स्टेट्सवर जगातल्या प्रत्येकाने प्रतिक्रिया द्यावीच अशी जबरदस्तीही करता येत नाही. म्हणूनच फेसबुक हे हल्लीच्या युगात आपलंच एक विस्तारीत आयुष्य झालंय. जगाला आपल्यात, आपल्या परवानगीनेच, आपल्याला हवं तेवढंच डोकावू देण्याची विस्तारीत खिडकी म्हणा हवं तर… म्हणूनच त्याला आत्ममग्न, आत्मकेंद्री असं न हिणवता जगात जास्तीत जास्त विस्तारण्याचा प्रयत्न म्हणायला हवं.. काही नेटिझन या यॉर्क विद्यापीठातल्या संशोधकांच्या अभ्यासाप्रमाणे आत्ममग्न असतीलही, पण फेसबुकवर सर्व काही तेच नसतात, फेसबुकवर प्रत्येकजण आपापल्या इच्छेनेच येतो. कुणीही त्याला जबरदस्ती करत नाही.
म्हणूनच फेसबुक म्हणजे या इंटरनेटच्या महाजाळ्यात फेसबुकने सुचवलेली व्याख्याच सर्वात जास्त समर्पक आहे, इथे प्रत्येकाला स्वतःची एक वेगळी ओळख पटते, स्वतःचा असा चेहरा सापडतो, कदाचित ध्येयही…