जर्मन बेकरी स्फोटाच्या लिंक थेट उदगीरपर्यंत पोहोचल्या… तसं सध्याच्या दहशतवादाच्या लिंक्स मराठवाड्यात तर केव्हाच पोहोचल्यात. त्यातल्या त्यात औरंगाबाद, बीड या गोष्टी तर आता बऱ्याच जुन्या झाल्यात…
पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या शैक्षणिक शहरात पहिला अतिरेकी हल्ला करण्याचं षडयंत्र मात्र उदगीरमध्येच रचलं गेलं. मराठवाड्यात लातूर, अहमदपूरपाठोपाठ उदगीर हे शिक्षणाचं मोठं केंद्र मानलं जातं. उदगीरचं महाराष्ट्र उदयगिरी क़ॉलेज म्हणजे त्या भागातलं एक मोठं प्रस्थ… ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्राचार्य ना.य. डोळे याच कॉलेजात प्राचार्य म्हणून रुजू झाले आणि तिथूनच निवृत्त आले. त्यांनी या कॉलेजला वाढवलं.
आता हे उदगीर दहशतवाद्यांच्या स्लीपर्स सेलचंही महत्वाचं ठिकाण बनल्याचं महाराष्ट्र एटीएसच्या कारवाईवरून उघड झालंय. उदगीरच्या मिर्झा हिमायत बेग याच्या इंटरनेट कॅफेत जर्मन बेकरीचं टारगेट फिक्स झालं. जर्मन बेकरीत बॉम्ब ठेवणारा मोहम्मद अहमद झरार सिद्दीबप्पा उर्फ यासीन चौधरी, सोलापूरचा शेख लालबाबा मोहम्मद हुसेन उर्फ बिलाल आणि बीडचा मिर्झा हिमायत बेग याची बैठक ग्लोबल इंटरनेट कॅफेत झाली. महिन्याभरापूर्वीच त्याने हा कॅफे विकून टाकलाय.
मिर्झा हिमायत बेग हा फक्त 29 वर्षांचा बीडचा तरीही लष्कर ए तय्यबाच्या महाराष्ट्र युनिटचा प्रमुख… दुसरा सोलापूरचा बिलाल, आणि तिसरा यासीन-सध्या फरार… वेगवेगळ्या गावचे आता पोलीस कोठडीत…
जर्मन बेकरी स्फोटाचा छडा लावल्याचा दावा महाराष्ट्र एटीएसने यापूर्वीही केला होता, मात्र तेव्हा चूक झाल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. आता त्यांनी अधिक वेळ घेऊन आणि जास्तीचा तपास करून दोघांना अटक केलीय. पण यामुळे तसं शांत आणि संपन्न असलेल्या उदगीरचं नाव एटीएसच्या रडारवर आलं.
उदगीर म्हणजे महाराष्ट्र उदयगिरी कॉलेज, उदगीर म्हणजे प्रसिद्ध किल्ला… आणि मामाचं गाव एवढंच माहिती होतं. उदगीरहून हैदराबादला जाणं सोपं आहे, म्हणून एकदोनदा मामाला भेटून पुढे गेल्याचंही आठवतंय. एसटीची भाडेवाढ झाली तरी त्याचा फारसा भार आपल्याला पडत नाही, कारण कमालनगरला लगेच कर्नाटकची बॉर्डर सुरू होते. त्यामुळेही उदगीर चांगलं लक्षात आहे… उदयगिरी कॉलेजजवळच्या एमआयडीसीच्या पायथ्याला माझ्या मामाचं गाव… लोणी.. त्यामुळे उदगीरचा संबंध तसा खूप जपळचा… आम्हाला येरमाळ्याच्या जत्रेतच फक्त म्हणजे वर्षातून एकदा टुरिंग टॉकिजमध्ये सिनेमा पाहायची सोय व्हायची… मामाला मात्र उदगीरला जाऊन सहज केव्हाही सिनेमा पाहता यायचा. तेव्हा मामाचा खूप हेवा वाटायचा.
पुण्यातल्या जर्मन बेकरी स्फोटाची उदगीर लिंक उघड झाल्यानंतर इंटरनेटवर उदगीरचा तपशिलात शोध घेतला. तर लोकसंख्या दोनेक लाखांच्या आसपास आताच्या सेन्सस नुसार… तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे साक्षरतेचं प्रमाण राष्ट्रीय प्रमाणापेक्षाही मोठं म्हणजे 71 टक्के… राष्ट्रीय प्रमाण आहे फक्त 59 टक्के… पण निजाम राजवटीत राहिल्यामुळे शहराचा तोंडवळा बऱ्यापैकी मुस्लीम आहे, उदगीरचं उदगीर हे नाव उदगीरबाबा म्हणजेच संत उदयगिरी यांच्यामुळे पडल्याचं सांगितलं जातं. कर्नाटक जवळ असल्यामुळे लिंगायतांची संख्याही लक्षणीय आहे.
उदगीरचा इतिहासही चांगला आठेकशे वर्षांपासूनचा असल्याचे दाखले दिले जातात. पार बहामनी काळापासूनचे… उदगीरचा भक्कम किल्ला त्याच काळातला, उदगीरची महत्वाची लढाई म्हणजे पेशवे आणि निझाम यांच्यातली. 1759 मध्ये सदाशिवराव भाऊंनी निजामाचा इथेच पराभव केला. याच किल्ल्याजवळ उदगीरच्या दोन मोठ्या मशिदींपैकी एक आहे, तिचं नाव जामा मशिद तर शहरात आहे ती मकबरा मशीद..याच किल्ल्यात उदगीरबाबाची समाधी आहे.
मामासोबत कधी उदगीरबाबाच्या मंदिरात गेल्याचं आठवत नाही, पण तिथे मोठी जत्रा भरते हे मात्र ठाऊक आहे, उदगीर आणि त्याच्या मुस्लीम तोंडवळ्याचा आणखी संदर्भ म्हणजे आईला रझाकारांचा काळ स्पष्टपणे आठवतो… उदगीरला रझाकारांचं मोठं ठाणं होतं, असंही तिच्या आठवणीत आहे..
उदगीरला रिलायन्स बिग सिनेमा मल्टिप्लेक्स हॉलही आहे, यावरूनच्या त्याच्या संपन्नेची साक्ष पटावी… तसंच अलीकडेच पैसा असणाऱ्या शहरात आणि महानगरातच आढळणाऱ्या आयसीआयसीआय बँकेनेही उदगीरमध्ये ब्रँच सुरू केलीय.
प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफचा जन्मही उदगीरमध्येच झाल्याचा उल्लेख विकीपिडीयामध्ये आहे. हे मलाही विकीपिडीयावर लॉगऑन करेपर्यंत ठाऊक नव्हतं.
पण आता उदगीर जॅकी श्रॉफच्या जन्मगावाप्रमाणेच जर्मन बेकरीतल्या स्फोटाचा कट रचला गेलेलं गाव म्हणूनही ओळखलं जाईल…