बार्शी… तसं लौकिकअर्थाने कधीच गिरणगाव नव्हतं… जयशंकर मिल म्हणजेच बार्शी टेक्स्टाईल मिलचा भोंगा (सायरन) अजूनही वाजतो आणि बार्शीची ती एक खास ओळख आहे… बार्शी गिरणगाव नसलं तरीही…
बार्शीत पहिल्यांदा आलो ते 1987 साली… येरमाळ्याहून आलो होतो, अण्णांसोबत… बार्शीला घर हलवायचा निर्णय झाला होता, तेव्हा… सर्वात आधी मला शाळेत घालावं लागणार होतं. जामगाव रस्त्यावर म्हणजे येरमाळ्याकडून येणाऱ्या मार्गावर असलेलं बार्शीतलं एक मोठं शैक्षणिक संकुल… (किंवा कॅम्पस म्हणा हवं तर… म्हणतात ते पुढे पुण्यात आल्यावर कळलं) एसटीतून वडिलांसोबत खाली उतरल्यावर समोरच शाळेची मोठी कमान होती. माझ्य़ासाठी शाळेचीच कारण त्या अवाढव्य कमानीवर एका महाविद्यालयाचं नाव कोरलेलं असल्याचं बरंच नंतर वाचता आलं… मग थोडं चालत आल्यावर बार्शी टेक्निकल हायसकूल लागलं. भला मोठा परिसर… यापूर्वी शाळेचा एवढा मोठा परिसर कधी पाहिलाच नव्हता…
शाळेत जाण्यापूर्वीच सकाळी अकराचा सुमार असावा, एकाएकी खूप जवळून मोठ्ठा आवाज करत एखादं विमान जावा, किंवा कुणीतरी शत्रूराष्ट्राने आक्रमण करावा असा, कर्णकर्णश आवाज झाला, धडकी भरणारा आवाज… प्रचंड घाबरलो… काहीच सुचत नव्हतं. पण त्याचवेळी शाळेच्या मैदानात अनेक माझ्यापेक्षाही लहान मुलं खेळंत होती, जसं काही झालंच नाही की त्यांना काही ऐकायलाच आलं नाही… हळूहळू तो कर्णकर्कश आवाज कमी कमी होत गेला. शांत झाला, मी अण्णांना विचारल्यावर त्य़ांनी सांगितलं की तो मिलचा भोंगाल होता.. तिथल्या मुलांना बहुतेक ते सवयीचंच असावं. त्यामुळेच मला जशी धडकी भरली तसं घाबरणं त्यांच्या गावीही नव्हतं…
बार्शीत पाऊल ठेवल्या ठेवल्या तिथल्या मिलच्या भोंग्यानं मला सलामी दिली… अजूनही भोंगा ऐकला की त्या दिवसाची आठवण होते. पण घाबरायला होत नाही… कारण दररोज सकाळी साडेसहा आणि सात, दुपारी अकरा वाजता, त्यानंतर तीन आणि साडेतीन, नंतर रात्री साडेसात आणि आठ वाजणारा भोगा गेल्या 23 वर्षात चांगलाच कानवळणी पडलाय. म्हणूनच बार्शी लौकिकार्थाने गिरणगाव नसलं तरी दररोज वाजमारा भोंगा ही बार्शीची एक ठळक ओळख आहे…
पण बार्शीत कोणेएकेकाळी मंजे आताच्या भाषेत वन्स अपॉन ए टाईम तीन तीन सुतगिरण्या होत्या… एक राजन मिल, दुसरी लोकमान्य मिल आणि तिसरी जयशंकर मिल… राजन मिलच्या मालकाने म्हणे त्यावेळची अभिनेत्री मुमताजशी लग्न केलं होतं, खरं खोटं त्यांनाच माहिती… तर लोकमान्य मिल लोकमान्य टिळकांनीच स्थापन केल्याचं सांगतात… आता ती मिल जागेसह विश्वनाथ कराडांनी विकत घेतल्याची चर्चा बार्शीकर करतात. तिसरी मिल जयशंकर… आता त्याचं नाव बार्शी टेक्स्टाईल मिल म्हणजेच बीटीएम… एनटीसीच्या ताब्यात आहे. आणि या तीन गिरण्यातली ही एकमेव गिरणी सध्या सुरू आहे…
दरवर्षी 30 जानेवारीला सकाळी दहा-अकराच्या सुमारास दोनेक मिनिटांच्या अंतराने भोंगा वाजतो. महात्मा गांधीजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी… ज्या जुन्या लोकांना हे माहितीय, ते अजूनही या वेळेत, त्या दिवशी दोन मिनिटे जिथे असेल तिथे शांतपणे उभं राहून मौन पाळतात…
बार्शीतून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नसला तरी वन्स अपॉन अ टाईम इथे तीन तीन मिल्स होत्या… हा एक रेल्वेमार्ग होता, रेल्वेच्या इतिहासात तो बार्शी लाईट या नावाने प्रसिद्ध आहे… नॅरोगेज रेल्वे मार्ग आहे, बार्शी हे लातूर-येडशी-बार्शी-कुर्डूवाडी-पंढरपूर-मिरज या मार्गावरचं महत्वाचं गाव… आणि बाजारपेठ… आणि देवस्थानही…
बार्शीत भगवंताचं खूप जुनं देवस्थान आहे.. या देवस्थानाच्या चारही बाजूने दरवाजे आहेत. पुराणात अंबरिष राजा इथे राज्य करत असल्याचे उल्लेख सापडतात म्हणे… शाळेत असतानाच कधीतरी ऐकलं होतं,
दहा खंड पृथ्वी, अकरा खंड काशी, बार्शीत नांदतो अंबऋषी…
आईने कुठल्यातरी पोथीत निघालेली, अंबरिषी राजाची गोष्ट सांगितली होती, पण आता तपशीलाने आठवत नाही…
बार्शीचा पुराणातला आणखी एक उल्लेख म्हणजे भगवान विष्णुची श्री भंगवंत या अवतारातलं मंदिर फक्त बार्शीतच आहे, अन्यत्र कुठेही नाही… आणि म्हणूनच पंढरपूरला जाऊन केलेला एकादशीचा उपवास बार्शीत येऊनच सोडावा लागतो, असं मानलं जातं, म्हणूनच अनेक भविक पंढरपूर वारीनंतर बार्शीत येऊन द्वादशी सोडतात… खरं-खोटं त्यांनाच माहित…
बार्शीविषयी लिहायचं… म्हणून इंटरेनटवर बराच शोध घेतला, तेव्हा विकीपीडिया मराठीमध्ये खूपच त्रोटक माहिती सापडली… इंग्रजी विकीपीडियामध्ये जरा जास्त माहिती सापडली… ती माझ्या ब्लॉगमध्ये पोस्ट केली तरी तेवढ्याने समाधान होत नव्हतं… कारण या कोरड्या माहितीच्या पलिकडेही बार्शी अजून बरंच काही आहे, असं वाटलं कारण मला त्यामुळेच बार्शी मनापासून भावलीय. अजूनही माझं गाव बार्शीपासून येरमाळ्याच्या दिशेनं तेरा किलोमीटर अंतरावर (दगड धानोरे) असताना कोणीही विचारलं की सोलापूर असं जिल्ह्याचं गाव न सांगता, थेट बार्शीच असं हट्टाने सांगतो. बार्शी कुठे असं विचारल्यानंतरच मी सोलापूर जिल्हा असा उल्लेख तपशीलात सांगतो.
बार्शी… म्हणजे मराठवाड्याचं प्रवेशव्दार, मराठवाड्याचा नकाशा पाहिला की तुम्हाला बार्शीचं स्थान निश्चित करायला वेळ लागत नाही. उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर आहे बार्शी… उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन वेगवेगळ्या तालुक्यांतून म्हणजे तुळजापूरहून परांड्याला जायचं असो किंवा कळंबहून परांड्यांला जायचं असलं की तुम्हाला बार्शीतून रस्ता असतो.
बार्शी म्हणजे भंगवंताचं मंदिर, बार्शी लाईट रेल्वे, आता गावाच्या प्रचंड बाहेर गेलेलं ब्रॉडगेज रेल्वे स्टेशन, तीन तीन सुतगिरण्या, दोन बंद पडल्या तरी त्यातल्या बीटीएमचा दररोज वाजणारा भोंगा… शिवाजीनगर आणि सुभाषनगर, कर्मवीरनगर, परांडा रोड, मुंबईनंतरचं थेट बार्शीत असलेलं सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल, बार्शी कॉलेज आणि शिवाजी क़ॉलेज, सुलाखे हायस्कूल, लिंगायत विरूद्ध मराठा… दाणेगल्ली, चाटी गल्ली… पांडे चौक… ज्याचं नाव या बार्शीतल्या प्रमुख चौकाला दिलं गेलंय, ते पांडे कोण याचा उलगडा अनेक वर्षे होतच नव्हता, पण कधीतरी त्यांचा फोटो पांडेचौकात चागला, ते कोण, त्याचं काम काय अजूनही मला माहिती नाही… पण पांडेचौक आहे, बार्शीतले खांडवीकर्स, महाद्वार चौक, भव्य शॉपिंग सेंटर… कोठारी बिल्डिंग असं बरंच काही म्हणजे बार्शी आहे… या यादीत आणखी बरीच भर टाकता येईल, तेव्हा कुठे बार्शीची ओळख पूर्ण होईल…