अमेरिकेला आता युद्ध नकोय तर अर्थव्यवस्था सुधारायचीय. गेले सात वर्षे इराकमध्ये तळ ठोकून असलेलं अमेरिकी सैन्य आता परतीच्या वाटेवर आहे… आता तिथे शिल्लक असलेलं पन्नासेक हजार सैन्य पुढच्या वर्षभरात परतेल, सैन्याच्या परतीच्या या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष जॉन बिडेन जातीने हजर रहिले… त्यांनीच इराकी स्वातंत्र्याची मोहीम संपवत असल्याचं जाहीर करत उरलेलं पन्नास हजार सैन्य आजपासूनच ऑपरेशन नवी पहाट राबवणार आहे, आणि हे सैन्य इराकी सैन्याला शांतता आणि सुव्यवस्थेच्या कामात सहाय्य करणार आहे.
2003 मध्ये त्यावेळचे अध्यक्ष जॉन बुश यांनी इराकमधली लष्करी कारवाई सुरू करण्याचे आदेश ज्या ओव्हल ऑफिसमधून दिले, त्याच ठिकाणाहून अध्यक्ष बराक ओबामांनी इराकमधलं युद्ध संपल्याची घोषणा केलीय. इराकमध्ये तब्बल सात वर्षे अमेरिकी सैन्याचा तळ होता… पुढचं आणखी एक वर्ष गृहित धरलं तर आठ वर्ष होतील… आज अध्यक्ष बराक ओबामांनी घेतलेला सैन्य माघारीचा निर्णय म्हणजे त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यातल्या एका आश्वासनाची पूर्तता होती.
पण या सात वर्षात तब्बल एक लाख इराकी नागरिक, 4400 अमेरिकी सैनिक आणि एक ट्रिलियन डॉलर्स खर्ची पडलेत… एक ट्रिलीयन म्हणजे एकावर बारा शून्य… 1,000,000,000,000 सोप्या शब्दात एक हजारवेळा अब्ज... म्हणजे बिलियन… अमेरिकी बिलीयन म्हणजे एकावर नऊ शून्य… थोडक्यात म्हणजे एक लाख कोटी अमेरिकी डॉलर्स… भारतीय रूपयांमध्ये मोजायचं तर त्याला 47 ने गुणा… ऑनलाईन करन्सी कन्वर्टरमध्ये एक ट्रिलियन म्हणजे 46,695,007,374,511.72… हा आकडा कसा मोजायचा ते माहिती नाही… ढोबळमानाने 47 लाख कोटी रूपये… म्हणूनच आता अध्यक्ष बराक ओबामांना अर्थव्यवस्था सुधारायची आहे, अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करायचं आहे.. एकवेळ या पैश्यांची भरपाईही होईल, मात्र 4400 अमेरिकी नागरिकांचा मृत्यू अमेरिकी जनतेला जास्त कासावीस करणारा आहे…
इराकमधून सैन्य माघारीची घोषणा करताना ओबामांनी आधीचे अध्यक्ष बुश यांचा उल्लेख करतानाच युद्धाविषयी असलेल्या मतभेदांचाही उल्लेख केला, मात्र बुश यांच्या निर्णयाविषयी त्यांनी काहीच मत व्यक्त केलं नाही… हाच धागा पकडून ओबामांकडून अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झालेल्या जॉन मॅकेन यांनी इराकमध्ये सैन्य पाठवण्याचा बुश यांचा निर्णय योग्यच असल्याचा दावा केला. हे झालं राजकारण…
… जाता जाता त्यांनी अफगाणिस्तानचाही उल्लेख केला. अफगाणिस्तानातलं अमेरिकी सैन्यही ठराविक मुदतीसाठीच असल्याचं सांगितलं…
आता अध्यक्ष ओबामांना अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करताना बेरोजगार झालेल्यांना प्राधान्याने नोकऱ्या द्यायच्या आहेत. म्हणजे इराकमधलं युद्ध संपलं असलं तरी अमेरिकेतलं अर्थव्यवस्थेचं युद्ध लढायचं आहे. कदाचित हे युद्ध इराक आणि अफगाणिस्तानमधल्या युद्धापेक्षा अधिक कठीण असेल..