सुनंदा पुष्कर आणि कळसूबाई शिखर…

कळसूबाई शिखर आणि सुनंदा पुष्कर यांच्यात तसं काहीच नातं नाहीय… असण्याचं कारणही नाही… नाही म्हणायला, सुनंदा पुष्कर जेव्हा भावी पतीसोबत म्हणजे शशी तरूर यांच्याबरोबर शिर्डी आणि शनी शिंगणापूरला आल्या होत्या तेव्हा त्यांना याच जिल्ह्यात असलेल्या कळसूबाई शिखराची माहिती कुणीतरी दिली असण्याची शक्यता आहे… तेवढाच काय तो संबंध फार तर बादरायण म्हणा हवं तर..

स्टार माझासाठी पुण्यातल्या प्रतिष्ठित जर्नालिझम इन्स्टिट्यूटमध्ये कॅम्पस् सिलेक्शनसाठीची लेखी परीक्षा पार पडली… या परीक्षेत शंभरावर विद्यार्थ्यांनी भाग घेतला… त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे,  या प्रश्नाला काही मोजक्याच विद्यार्थ्यांनी कळसूबाई शिखर असं उत्तर देत ते अहमदनगर जिल्ह्यात असल्याचं लिहिलं… तर बहुतेक सर्वांनी कळसूबाई असं सर्वात उंच शिखराचं नाव सांगतानाच कुणाला ते सातारा जिल्ह्यात असल्याचं वाटलं तर कुणाला ते नाशिकमध्ये… कळसूबाईला रत्नागिरी आणि रायगडात नेऊन ठेवणारेही अनेकजण होते… ज्यांना ते नेमकं कोणत्या जिल्ह्यात आहे, याविषयी प्रश्न पडला त्यांनी नगर आणि नाशिकच्या सीमेवर असं उत्तर देऊन वेळ मारून नेली… पण त्याचवेळी या सर्वांनी मात्र कोची आयपीएलमध्ये वादग्रस्त ठरलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या मैत्रिणीचं – आता बायकोचं नाव मात्र बिनचूक लिहिलं… तसं पाहिलं तर सुनंदा पुष्करचा महाराष्ट्राशी काहीच संबंध नाही… कारण त्या लेखी परीक्षेत विचारलेल्या इतर प्रश्नांमध्ये दोनेक वगळता इतर सर्व महाराष्ट्राशी, त्यातल्य़ा त्यात पुण्या-मुंबईशीच संबंधित होते… पण महाराष्ट्राशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देताना अडखळणाऱ्या या विद्यार्थ्यांपर्यंत सुनंदा पुष्करचं नाव मात्र पोहोचलंय… तिचा इतिहास आणि कर्तृत्वही माहिती आहे..

दुसरं म्हणजे गूगलवर सुनंदा पुष्कर असं इंग्रजीतून सर्च केलं तर 1,460,000 results (0.20 seconds)  शून्य पॉईन्ट वीस सेकंदात तब्बल चौदा लाख साठ हजार दुवे तुमच्यासमोर येतात. हेच तुम्ही गूगल इमेजमध्ये सर्च केलं तर  24,900 results (0.35 seconds) तुम्हाला फक्त अर्ध्या सेकंदात मिळतात. तर तुम्ही गूगलवर देवनागरीतून म्हणजे मराठीतून टाईप कराल तर फक्त 2,610 results (0.30 seconds) अर्ध्या सेकंदात दोन-अडीच हजार फोटो मिळतात… आणि वेब असा ऑप्शन दिलात तर 48,600 results (0.19 seconds) हा आकडा तुमच्या समोर येतो… आता तुम्ही गूगलला कळसूबाई शिखर असं मराठीतून विचारलं, 2,670 results (0.23 seconds) तर तुमच्या समोर तीन हजारपेक्षा कमीच दुवे येतील… आणि गूगल इमेजेस मध्ये अवघे पावणेतीनशे… पुन्हा सगळे फोटो कळसूबाई शिखराचे असतील, याची गॅरन्टी नाही.. KALSUBAI PEAK असं इंग्रजीतून विचाराल तर गूगल तुमच्यासमोर 2150 इमेजेस ठेवेल… आणि गूगल वेबवर हा आकडा जातो 3450 वर…

थोडक्यात काय तर महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर गूगलच्या आणि पत्रकारितेत येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मात्र खूप तळाशी आहे…… कारण आपण शाळेपासूनच्या पुस्तकांमध्ये जरी शिकलो तरी कळसूबाई शिखर कुठे आहे… हेच आपल्याला माहिती नाही.. शिवाय आपलंच तर कळसूबाई शिखर त्याचा ठावठिकाणा गूगलमध्ये कशाला शोधायला हवा…  मग माझ्या महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर, सह्याद्रीचं सर्वात उंच टोक कुठे असेल तर माझ्याच जिल्ह्यात नाही तर मला माहिती नसलेल्या अशा कोणत्यातरी जिल्ह्यात… म्हणजे कधी ते साताऱ्यात जातं तर कधी रायगडात तर कधी रत्नागिरीत… कळसूबाई नाशकात असेल कदाचित असंही अनेकांना वाटतं… किंवा अनेकांना ते भंडारदऱ्याच्या जवळिकीमुळे थेट भंडारा जिल्ह्यातही असल्याचा साक्षात्कार होतो.

या सर्वांचा सुनंदा पुष्करशी संबंध काय तर तसा काहीच नाही, पण गूगल जसं सुनंदा पुष्कर यांच्याशी जवळीक साधून आहे, तुम्ही मराठी किंवा इग्रजीतून विचारलं तरी तुमच्या समोर ढिगभर दुवे आणून टाकतो, तसंच आमच्या आजच्या पत्रकारिता शिकणाऱ्या मुलांचं आहे.. पत्रकारितेचे हे विद्यार्थी हल्ली गूगलच्या सर्वाधिक सानिध्यात असतात. त्यामुळेच गूगलप्रमाणेच त्यांनाही कळसूबाई म्हटलं की हाताच्या बोटांवर मोजावे इतकेच दुवे सापडतात.

नवीन तंत्रज्ञानाशी नाळ जोडणाऱ्या आणि गूगलच्या कायम संपर्कात असलेल्या या विद्यार्थ्यांना तरी का दोष द्यायचा… कारण त्यांच्यासमोर जे दिसतंय तेच त्यांच्या मनातही ठसत असणार…

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: