तंत्रज्ञानाचा पत्रकारितेवर परिणाम

(विमर्श – या ठाण्यातून प्रकाशित होणाऱ्या त्रैमासिकासाठी हा लेख लिहिला होता…)

टाईम्स ऑफ इंडियाच्या 17 डिसेंबरच्या अंकातली एक बातमी आहे. कॉम्प्युटर्स इमेजेस म्हणजेच व्हर्चुअल अँकर्स लवकरच खऱ्याखुऱ्या अँकर्सची जागा घेतील. अमेरिकेतल्या नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातल्या मॅककॉर्मिक स्कूल ऑफ इंजिनीयरिंग अँड अप्लाईड सायन्सेसच्या इंटेलिजेन्ट इन्फॉर्मेशन लॅब म्हणजे इन्फोलॅबमध्ये व्हर्च्युअल अँकर प्रोजेक्टवर काम सुरू आहे… टेक्स्ट अँड स्पीच टेक्नॉलॉजीवर हा प्रोजेक्ट आधारलेला आहे. त्याहूनही महत्वाचं म्हणजे हा कॉम्प्युटर प्रोग्राम स्वतःच वेबवरून वेगवेगळी माहिती जमवून स्वतःच स्वतःचं स्क्रीप्ट तयार करेल, त्यासाठी आवश्यक ती व्हिज्युअल्स मिळवून ते एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवेल. सध्या या प्रयोगात काही अडचणी आहेत. लवकरच त्यावरही तोडगा शोधला जाईल.

व्हर्चुअल अँकर हा तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा एक महत्वाचा आणि क्रांतीकारक टप्पा मानायला हवा.

हा क्रांतीकारक टप्पा मान्य केला की, तंत्रज्ञानातल्या प्रगतीने पत्रकारितेवर काय काय आणि कसा परिणाम झालाय यावर चर्चा करता येईल.

मुळात छपाई किंवा मुद्रणकलेचा शोध हा सुद्धा तंत्रज्ञानाच्या प्रगतीला एक महत्वाचा टप्पा होता. सुरवातीला शिळा प्रेस, त्यानंतर ब्लॉक अगदी अलीकडची फौंड्रीचे खिळे जुळवून केली जाणारी छपाई ते थेट ऑफसेट प्रिंटिग असे प्रकार प्रिंट जर्नालिझमने पाहिले. त्यामध्ये अजूनही नवनवं तंत्रज्ञान येतंय. त्यात दिवसागणिक नवे व्हर्जन आणि अपडेट…

इंटरनेट ही आणखी एक नवी संपर्क क्रांती.. त्यात सर्च इंजिनने घातलेला धुमाकूळ तर अफलातूनच… याला धुमाकूळ म्हणायचं कारण असं की इंटरनेटच्या महाजंजाळातून तुम्हाला हवी ती माहिती शोधून तुमच्या स्क्रीनवर आणून ठेवण्याचं काम अगदी एका क्लिकइतकं सोपं झालं. त्यातल्या अर्थकारणामुळे आणि माहिती प्रसाराच्या अफाट वेगामुळे अनेक वृत्तपत्रांना म्हणा किंवा प्रसारमाध्यमांना इंटरनेट हे कधी कधी एक आव्हानही वाटतं. त्याचीच एक झलक परवा हैदराबादच्या वॅन-इन्फ्राच्या ग्लोबल मीटमध्येही दिसली. त्याच दरम्यान कधीतरी न्यूज कॉर्पोरेशनच्या रूपर्ट मरडॉक यांनी वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये लिहिलेल्या लेखावरूनही इंटरनेट टेक्नॉलॉजीने निर्माण केलल्या आव्हानांची जागतिक स्तरावर चर्चा झाली. फरक एवढाच की वॅन-इन्फ्रामध्ये गूगलने प्रसार माध्यमांना त्याचा मोबदला द्यावा, यावर भर दिला गेला तर रूपर्ट मरडॉक यांनी इंटरनेट टेक्नॉलॉजीला आव्हान न समजता एक पूरक प्रतिस्पर्धी मानण्यावर भर दिला. शिवाय या इंटरेनट तंत्रज्ञानाचा आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी वापर करून घेण्याचा प्रयत्न न्यूज कॉर्पोरेशनमध्ये कसा सुरू आहे, याचा तपशीलही दिला. एवढंच नाही तर इंटरनेटवर माहितीची चोरी कशी होते, हा प्रकार म्हणजे ज्ञानावरचा दरोडा कसा ठरतो हेही स्पष्ट केलं. त्यातूनच क्वालिटी कॉन्टेन्टसाठी आपले ग्राहक पैसे मोजतील, असा आत्मविश्वासही व्यक्त केलाय.

टेलिव्हिजन तर सुरवातीपासूनच तंत्रज्ञानाधिष्टीत प्रसारमाध्यम आहे. टेलिव्हिजनच्या शोधापासून ते थेट आजपर्यंत सगळं काही तंत्रज्ञान आणि त्याचा झपाट्याने झालेला विकास. आधी केबलच्या सहाय्याने अतिशय मर्यादित प्रसारण, नंतर टेरेस्टिरियल आणि  त्याहीनंतर सॅटेलाईट प्रक्षेपण… प्रसारमाध्यमातल्या प्रिंट, रेडिओ, टीव्ही आणि इंटरनेट या प्रकारात सर्वात आधुनिक असं माध्यम… तसं पाहिलं तर इंटरनेट सर्वात तरूण मात्र त्याला काही अंगभूत मर्यादा आहेत.

टेलिव्हिजन किंवा ब्रॉडकास्ट जर्नालिझमचा वेगवेगळ्या टप्प्यावर झालेला विकास आणि त्यावेळी त्यांच्यासमोर उभी टाकलेली आव्हानं यामुळे वेळोवेळी या माध्यमापुढे नवनवी आव्हाने निर्माण झाली.

अमेरिकेतले एक महान टेलिव्हिजन जर्नालिस्ट एडवर्ड मरो यांचा जर्नालिझम आणि तंत्रज्ञान या संदर्भातला एक खूप चांगला उतारा आहे.  ते म्हणतात,

The good journalist is a treasure, and they won’t be able to develop or clone him in a laboratory. The problem that television faces, in my opinion, is for the creativity to keep up with the racing technology. I don’t care whether or not a story is coming via satellite, has been written by computer and transmitted by a correspondent with antenna implanted in his head . If he can’t write, he can’t write : by satellite or quill pen. If he can’t report, he can’t report. And all of the technology in the world can’t save him.

म्हणजे टेक्नॉलॉजीचा कितीही झपाट्याने विकास झाला तरी चांगल्या पत्रकाराला किंवा त्यांच्या कामगिरीला तोड नाही. त्याच्या कामगिरीला तंत्रज्ञान हे फक्त पूरक आहे. पण एडवर्ड मरो यांच्यानंतरही अफाट बदल झालेत. त्यांच्या काळी असलेल्या टेप आता नाहीत. किंवा बातम्यांचे कागद हातात धरून किंवा फ्लोअर मॅनेजरने कॅमेऱ्याच्या मागून दाखवण्याची पद्धत केव्हाच अडगळीत गेलीय. आता ऑटो क्यू… किंवा ऑटो स्क्रीप्ट, टेलिप्रॉम्प्टर अशी नवनवी साधने वृत्त निवेदकाच्या हाताशी आहेत. टेलिप्रॉम्प्टरमुळे न्यूजकास्टरला थेट प्रेक्षकांच्या डोळ्यात पाहून बातम्या देता येतात. टेलिप्रॉम्प्टरचा स्पीड कंट्रोलही आता न्यूज कास्टरच्याच हाताशी आहे.

तंत्रज्ञानातल्या क्रांतीने आपल्या संबंध जगण्यावर परिणाम केलाय. पत्रकारिता (तुम्ही पत्रकार असा किंवा नसा) हाही आपल्या जीवनाचा एक भाग आहे. म्हणूनच आपल्या जगण्यावर जे जे परिणाम तंत्रज्ञान क्रांतीवर झालेत ते सर्व पत्रकारितेवरही झालेत.

आपल्याकडे वृत्तपत्रे, नंतर रेडिओ, त्यानंतर टीव्ही, ब्लॅक अँड व्हाईट, मग कलर, त्यानंतर इंटरनेट, त्याच्याही नंतर पेजर मोबाईल असे संपर्क क्रांतीचे वेगवेगळे टप्पे आहेत. पहिल्यांदा दिवाणखान्यापुरतं मर्यादित असलेलं मनोरंजन रेडिओमुळे घरोघरी पोहोचलं. भारतीय संगीत क्षेत्राच्या विकासात रेडिओचं योगदान तर खूप मोठं आहे, त्यामुळे कधीकाळी खाजगी बैठकीपुरते असलेले मोठमोठे गायक लोकांच्या घराघरात पोहोचले. रेडिओवरही बातम्यांनी स्वतःसाठी स्पेस तयार केली, आणि बातम्या या रेडिओचा एक अविभाज्य भाग बनल्या.

त्यानंतर टीव्हीनेही अशीच क्रांती केली. व्हिज्युअल्स हे टीव्हीचं बलस्थान होतं. अर्थात त्याचा पसारा आणि खर्चही अफाट होता. पण व्हिज्युअल्समुळे टीव्हीची संपर्कक्षमता अफाट झाली होती. भारतासारख्या साक्षरतेचं प्रमाण जेमतेम असलेल्या देशात टीव्हीची लोकप्रियता झपाट्याने वाढली. मात्र त्यामुळे वृत्तपत्रे किंवा रेडिओच्या फारसा परिणाम झाला नाही. मधल्या काळात रेडिओ थो़डा वळचणीला गेला असला तरी आताच्या एफएम टेक्नॉलॉजीने रेडिओची पुन्हा भरभराटीचे दिवस आलेत. टीव्हीवरही बातम्यांनी स्वतःची स्पेस तयार केली. एका बातमीपत्रापासून सुरू झालेला हा प्रवास थेट चोवीस तास बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या चॅनेलपर्यंत सुरू झाला. एवढ्यावरच न थांबता आता स्पेशलाईज्ड न्यूज म्हणजे इंग्रजी, हिंदीसह वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमधल्या बातम्या, फक्त व्यापारविषयक बातम्या, स्पोर्टस् विषयक, हवामान, प्रवास-लाईफ स्टाईल बातम्या देणाऱ्या वाहिन्या आहेत. सध्या देशाच्या अर्थकारणात सर्वात दुर्लक्षित आणि तरीही शोषित असलेलं क्षेत्र म्हणजे कृषि… फक्त कृषिविषयक बातम्या किंवा माहिती देणारं चॅनेल या भाऊगर्दीत अजून तरी नाही… मात्र तुमच्या टीव्हीवर लवकरच म्हणजे येत्या काही वर्षात असं चॅनेल दिसू लागल्यास त्यात काहीच आश्चर्य नसेल.

टीव्हीने आपलं जगणं आणि जगण्याचा एक भाग म्हणून पत्रकारितेवरही कब्जा केल्यानंतर इंटरनेट आणि मोबाईल क्रांतीने पत्रकारिता व्यापून टाकली. ते तुलनेनं सर्वात अलीकडचं म्हणून न्यू मीडिया असं नाव त्याला मिळालं. इंटरनेटवर वृत्तपत्रे केव्हाचं दाखल झालीत. इंटरनेटच्या माध्यमातून देशोदेशी पसरलेल्या आपल्या वाचकांपर्यंत ही वृत्तपत्रे पोहोचली आहेत. इंटरनेट तंत्रज्ञानाने भाषेचा अडसर दूर केल्यानंतर त्याची लोकप्रियताही झपाट्याने वाढलीय.  शिवाय इंटरनेटने फक्त वृत्तपत्रेच नाही तर प्रत्येक नेटीझनला स्वतःचं एक नेट-पत्र प्रकाशित ताकद दिलीय. ही सोय झालीय ब्लॉगिंगच्या माध्यमातून… ब्लॉगिंगमुळे तुम्हाला हवं तसं अभिव्यक्त होता येतं. एरवी तुम्हाला जे काही म्हणायचं-सांगायचं असतं ते ऐकून घेण्यासाठी श्रोते मिळतातच, असं नाही, तुम्ही काही लिहिलं तर ते वाचायला कुणी मिळेलच याची खात्री नाही, इंटरनेट ब्लॉगमुळे मात्र हे सर्व कृत्रिम अडथळे दूर करून सर्वसामान्याच्या हातात एक अभिव्यक्तीचं जबरदस्त साधन दिलंय. या ब्लॉगचे संपादकही तुम्हीच असता, तुम्हीच लिहिता, माहिती मिळवता, मतं व्यक्त करता, कुणालाही हव्या तश्या शिव्या घालू शकता. काहीही…. म्हणजे काहीही… तसं पाहिलं तर ब्लॉग ही एक बंडखोर अभिव्यक्ती आहे, सर्वसाधारण परिस्थितीत तुम्ही एखादा लेख लिहिला किंवा कविता लिहिली तर ते छापून येईपर्यंत बऱ्याच अडचणी येतात, मग ते वृत्तपत्रातून असो की पुस्तक रूपाने असो… त्यासाठी संपादाक-प्रकाशक गाठण्यापासून ते खपवण्यापर्यंत सर्व काही तुम्हालाच करावं लागतं. इंटरनेट ब्लॉगने अडथळ्यांची ही सर्व साखळीच नष्ट केलीय. तुम्हीच तुमचे प्रकाशक आणि संपादकही… वाट्टेल ते लिहा आणि करा पब्लिश… माऊसच्या एका क्लिकसरशी ते इंटरनेटच्या महाजालात सर्वासाठी उपलब्ध असेल. आता ब्लॉग काही फक्त टेक्स्ट पुरते मर्यादित नाहीत, तुम्ही त्यावर व्हिडिओ अपलोड करू शकता. तुम्ही तुमचे व्हिडिओ मोबाईलमधून शूट करा किंवा यू-ट्यूब आणि त्यासारख्या शेकडो साईट्सवर हवे तितके उपलब्ध असलेले व्हिडिओ शेअर करा. या संपर्क क्रांतीमुळे तुम्हाला टीव्ही पहायला घरी टीव्हीसमोर जाऊन  बसायलाच पाहिजे असं नाही. तुमचा आवडता प्रोग्राम तुम्हाला यू-ट्यूबवर सर्च केला की लगेच मिळून जाईल.

तसंच मोबाईलचं आहे. मोबाईल नसलेला भिकारीही आता शोधून सापडणार नाही. इथे भिकारी किंवा मोबाईल या दोघांचंही अवमूल्यन करायचा हेतू नाही. पण मोबाईल किती थोड्या कालावधीत अफाट पसरलाय, हे सांगणं हाच हेतू आहे. मोबाईलवर आलेला कॉल स्क्रीनवर पाहायचा आणि जवळच्या पीसीओ बूथवर जाऊन कॉल करणाऱ्याला फोन करायचा… हा प्रकार आता बराच मागे पडलाय, कारण त्यावेळी इनकमिंग चार्जेबल होतं, थोडं थोडकं नाही तर चांगला तीन ते चार रूपये असा रेट होता. आता इनकमिंग फक्त फ्री झालंय असं नाही तर इनकमिंगसाठी तुम्हालाच पैसे देणाऱ्या काही मोबाईल सेवा आहेत. या मोबाईलमध्ये इंटरनेट हे नवं असलं तरी त्यात विशेष काही नाही, मात्र SMS सेवेच्या माध्यमातून माहितीचं प्रसारण प्रचंड वेगाने होतंय. म्हणजे बातमी थेट तुमच्या हातातच… शिवाय तुम्हाला टीव्हीपुढे बसायची गरज नाही की पेपर स्टॉलवर जाऊन पेपर विकत घ्यायचीही गरज नाही. तर फक्त तुम्हाला आलेला मेसेस ओपन करून वाचायचा.. शिवाय प्रत्येक न्यूज ही ब्रेकिंग…

तंत्रज्ञानाने पत्रकारितेवर झालेला ठळक परिणाम म्हणजे बातम्यांसाठी फक्त टीव्ही किंवा वृत्तपत्रांवर अवलंबून राहण्याची लोकांची गरज बरीच कमी झालीय. लोकांना त्यांच्या मोबाईलमधून इंटरनेट ऍक्सेस करता येतो. शिवाय एसएमएसवरही ब्रेकिंग न्यूज मिळतात. वेगवेगळी टीव्ही चॅनेल्स, किंवा मराठीत सकाळसारख्या वृत्तपत्राने अशी एसएमएस सेवा सुरू केलीय. त्यामुळे ते कुठेही असले तरी तो बातमीच्या संपर्कात राहतो. शिवाय एसएमएसच्या माध्यमातून तो बातमीवर प्रतिक्रिया देऊ शकतो, म्हणजेच तो टू वे कम्युनिकेशन स्टिस्टीममध्ये सहभागी होतो. याचच विस्तृत किंवा व्यापक रूप आपल्याला सिटीझन जर्नालिस्ट या संकल्पनेत पाहायला मिळतो. म्हणजे पत्रकारिता ही फक्त जर्नालिझम केलेल्या आणि वृत्तपत्रात किंवा टीव्ही चॅनेलमध्ये काम करणारांची मक्तेदारी राहत नाही.

वाचक किंवा प्रेक्षक सजग झाल्यामुळे, त्याच्यापाशी उपलब्ध असलेल्या कम्युनिकेशनच्या साधनांमुळे तो सर्वांच्या संपर्कात आल्यामुळे किंवा सोप्या भाषेत टेक्नोसॅव्ही झाल्यामुळे  तो प्रसारमाध्यमांच्या नियमित कामात अप्रत्यक्ष सहभाग देऊ लागलाय. त्याचबरोबर वृत्तपत्रांनाही वाचक-प्रेक्षकांच्या या सहभागाला प्रतिसाद देण्यासाठी वाचक संपादक असं अभिनव पद तयार करावं लागतंय. दक्षिणेतल्या द हिंदू या इंग्रजी दैनिकाने सर्वात आधी रीडर्स इडिटरची पोस्ट निर्माण केलीय. पाश्चिमात्य देशात टीव्ही चॅनेल्समध्येही व्ह्युअर्स एडिटर्स आहेत. अजून या दोन्ही संकल्पना आपल्याकडच्या मराठी पेपर वा चॅनेलांनी ऍक्सेप्ट केल्या नसल्या तरी त्यासाठी स्पेस नक्कीच आहे.

अलीकडच्या काळात अनेक वृत्तपत्रांनी वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये साध्या पोस्टाने आलेल्या वाचकांच्या पत्रांसोबत ईमेल आणि एसएमएस द्वारे आलेल्या प्रतिक्रियांनाही स्थान द्यायला सुरूवात केलीय, त्यासाठी स्वतंत्र स्पेस द्यायलाही सुरूवात केलीय.

फार पूर्वी कधीतरी सकाळच्या एका बातमीदाराने लोकनायक बापूजी अणे यांची रेल्वेमध्ये घेतलेल्या मुलाखतीची बातमी तारेने पुणे कार्यालयाला पाठवली होती. त्यावेळी त्या बातमीच्या बायलाईनमध्ये आमच्या अमूक-अमूक बातमीदाराकडून तारेने असा खास उल्लेख करण्यात आला होता. आता पोस्टाची तार सेवा ही जवळ जवळ हद्दपार झालीय. पण आता कुणी बातमीच्या बायलाईनमध्ये ईमेल द्वारे किंवा अजून कोणत्या माध्यमातून असा खास उल्लेख करत नाही. वाट्टेल ते झालं, किंवा वाट्टेल त्या माध्यमातून बातमी इतरापेक्षा आपल्याकडे सर्वात आधी आणि सर्वापेक्षा वेगळी अशी बातमी आपल्याकडे यायला हवी, असा संपादकीय विभागासह व्यवस्थापनाचाही हट्ट असतो. कारण तंत्रज्ञानाच्या अफाट क्रांतीने आपल्या सर्वांना टोकदार स्पर्धेच्या टोकावर आणून ठेवलंय. त्यामुळे एखाद्या बातमीदाराला बातमी मिळवण्यासाठी जेवढा आटापिटा करावा लागतो, कदाचित त्यापेक्षाही जास्त आटापिटा ती आपल्या मुख्यालयापर्यंत पोहोचवण्यासाठी करावा लागतो. तसाच आटापिटा संपादकीय विभागातल्या सहकाऱ्यांना ती बातमी वृत्तपत्रात छापण्यासाठी किंवा बुलेटिनमध्ये प्रसारित करण्यासाठी करावा लागतो. कारण स्पर्धा… ही स्पर्धा फक्त तंत्रज्ञानातल्या क्रांतीमुळेच निर्माण झालीय.

वृत्तपत्रे किंवा चॅनेल यांच्यातली ही स्पर्धा आपल्याला जास्तीत जास्त खोलवर घेऊन जाणार आहे. याचं पर्यावसान कदाचित वृत्तपत्रांमध्ये तालुका स्तरावर एडिशन किंवा शहर पातळीवर स्वतंत्र टीव्ही चॅनेल (आज गावोगावी केबल चॅनेल आहेत) किंवा गावोगावच्या बातम्यांना प्राधान्य देणारी खास बातमीपत्रे लवकरच पाहायला मिळतील. या बदलाकडे तंत्रज्ञानाचा पत्रकारितेवर झालेला परिणाम म्हणूनच पहायला हवा. तंत्रज्ञानातल्या क्रांतीमुळे पत्रकारितेच्या वेगवेगळ्या प्रांतात म्हणजे बातम्या पाहणं-वाचणं, बातमीदारांनी त्या गोळा करणं-मिळवणं, वृत्तपत्रांनी-वाहिन्यांनी त्या छापणं-प्रसारीत करणं यामध्येही मोठा बदल झालाय. सतत विकसीत होणाऱ्या तंत्रज्ञानासोबतच हा बदल सातत्याने खोलवर जाणारा आहे. त्यातला एक ठळक बदल म्हणजे प्रसारमाध्यमे जास्तीत जास्त एकेकट्या ग्राहकांपर्यंत-वाचकापर्यंत-प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

या एकेकट्या युनिटच्या माध्यमातूनच आजच्या तंत्रज्ञान क्रांतीला हवा असलेला व्यापक बदल अपेक्षित आहे. कारण क्रांतीचं फलीत हे मुळात समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत त्याचे फायदे पोहोचवण्यात आहे. त्यामुळेच एकेका माणसाच्या गरजा लक्षात घेऊन प्रिंट आणि टीव्हीच्या कॉन्टेन्टची आणखी होतेय. हा ट्रेंड भविष्यात सतत वाढतच जाणार आहे.

वृत्तपत्रे किंवा चॅनेलांच्या बाजूने जसा प्रत्येक व्यक्तीनिहाय कॉन्टेट निर्मितीवर भर दिला जाईल तसाच प्रत्येक व्यक्तीनिहाय बातम्या पाहणं किंवा वाचणं यामध्ये बदल अपेक्षित आहे. हा एका अर्थाने तंत्रज्ञानाच्या झपाट्याने विकसित होण्याचाच परिणाम असेल. कुटुंबातल्या प्रत्येकाचा वृत्तपत्र वाचण्याचा किंवा टीव्ही पाहण्याचा प्राधान्यक्रम वेगवेगळा आहे. जिथे वेळा क्लॅश होतात, अशा ठिकाणी कार्यक्रम रेकॉर्ड करण्याची सोय किंवा एका घरात एकपेक्षा जास्त टीव्ही सेट्स अशी वाटणी पाहायला मिळते आहे, भविष्यात हे आणखी वाढत जाईल.

फार नाही पाच ते सहा वर्षांपूर्वीपर्यंत चॅनेलच्या विभागीय कार्यालयात 2MB लाईन असायची म्हणजे 2mbps या स्पीडने फाईल ट्रान्सफर करणारी सेवा… आता ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्याही 3mbps सेवा देण्याचं आश्वासन देत आहेत. म्हणजेच 2mbps च्या लीजलाईन घेऊन न्यूज गॅदरिंग करणाऱया चॅनेलांनी आता आपल्या बातमीदारांनाच लॅपटॉप आणि त्याला ब्रॉडबँड कनेक्शन द्यायला सुरूवात केलीय. यामुळे ऑफिस, वीज, आणि इतर खर्चात कमालीची बचत झालीय.

शनिवारी म्हणजे 19 डिसेंबरला गूगल या बलाढ्य सर्च इंजिनने वर्षभरात नेटिझन्सचा ट्रेंड काय आहे, याची आकडेवारी जाहीर केली. हा सर्व तपशील म्हणजे भारतीय युवा मन, जो जगाशी इंटरनेटने जोडला गेलाय, त्याला काय वाटतं, याचं प्रतिबिंब आहे. हा तपशील आता अनेक दिवस बातम्यांच्या रूपात चघळला जाईल, त्यावर वेगवेगळे लेख लिहिले जातील, कॅटरिना कैफ भारतीय युवकांच्या मनावर कशी अधिराज्य गाजवतेय किंवा गूगलच्या लोकप्रियतेत सचिन तेंडुलकर कसा दहाव्या क्रमांकावर फेकला याची चर्चा होईल. तसंच इंदिरा आणि सोनिया गांधी, एवढंच नाही तर बराक ओबामा यांना मागे सारून राहुल गांधी कसा सर्वाधिक शोधला गेलेला राजकारणी यावरही लेख लिहिले जातील, पण  हा तपशील जाहीर करताना गूगल इंडियाचे प्रॉडक्ट हेड विनय गोयल यांनी नोंदवलेला निष्कर्ष मला खूप महत्वाचा वाटतो. तो म्हणजे गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यावेळी मोबाईल फोनच्या माध्यमातून गूगल ऍक्सेस करणारांची संख्या चौपटीने वाढलीय. त्यामुळेच यावर्षी त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून गूगल वापरणांराकडे विशेष लक्ष दिलंय. हा ट्रेंड तंत्रज्ञानातल्या बदलाचा क्रांतीचा निदर्शक आहे. मोबाईल फोनच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हातात वेब ब्राऊसर आलाय. आता तर 3G चा जमाना आहे.

हातात 3G मोबाईल फोन असलेला तरूण किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आपलं मत जगात सर्वदूर पोहोचवण्याची क्षमता असलेले तरूणच यापुढील काळात प्रसारमाध्यमांचा कॉन्टेट ड्राईव्ह करण्याची शक्यता आहे. कारण तंत्रज्ञानातल्या संपर्क क्रांतीचा वापर करून घेऊन ते आपलं मत प्रसारमाध्यमांच्या मुख्यालयापर्यंत किंवा जिथे कुठे कॉन्टेन्ट क्रिएट होतो, तिथे पोहोचवू शकतील. आणि तेच एका अर्थाने त्यांना हव्या असलेल्या कॉन्टेन्टचे निर्माते असतील.

######

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: