मुंबईहून बार्शीमार्गे लातूरला गेलात की एक भव्य उड्डाणपूल तुमचं स्वागत करतो , लातूर या मराठवाड्यातल्या शहराविषयीचा तुमचा दृष्टीकोन बदलून टाकतो. उड्डाणपुलाच्या अगोदरच तुम्हाला एमआयडीसी लागते , आणि लातूर आल्याची जाणीव करून देते. तसं लातूर आपल्याला परिचित असतं, मुख्यमंत्र्याचं शहर म्हणून. लातूर पॅटर्न विकसित करणारं गाव म्हणून. मराठवाड्यातली एक महत्वाची बाजारपेठ म्हणून आणि भूकंपाचा भीषण धक्का सहन केलेलं गाव म्हणून………..
लातूरने गेल्या पंचेवीस वर्षात केलेला विकास कुणालाही थक्क करून टाकणारा आहे. लातूर या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका तालुक्याला पंधरा ऑगस्ट एकोणिशे ब्याऐंशीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला. तेव्हापासून स्वतंत्र ओळख मिळालेल्या या जिल्ह्याची प्रगतीपथावर घौडदौड सुरूच आहे. उस्मानाबाद या मूळ जिल्ह्याला तर केव्हाच लातूरने मागे टाकलंय. लातूरने शैक्षणिक क्षेत्रात लातूर पॅटर्नची दखल उभ्या महाराष्ट्राला घ्यायला लावली. सहकाराच्या क्षेत्रातही मुख्यमंत्र्यांच्या मांजराने वेगवेगळे विक्रम प्रस्थापित केलेत. व्यापार , कला-संस्कृती, राजकारण या सर्वच क्षेत्रात लातूरने एक स्वतंत्र ठसा निर्माण केलाय.
सर्व महाराष्ट्राला या शहराने आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. एरवी मराठवाडा म्हटलं की पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मागासलेला प्रांत अशी प्रतिमा उभी राहते. नैसर्गिक साधन संपत्तीचा संपन्न वारसा मिळूनही मराठवाडा तुलनेनं मागासलेलाच राहिला. त्याची कारणं इथं शोधण्याची आवश्यकता नाही , किंवा हे त्याचं व्यासपीठ नाही. पण लातूरने येणाऱ्य़ा सर्व अडचणींवर मात केली. हे मात्र वास्तव आहे , आणि त्याची दखल घ्यावीच लागेल.
लातूरला ऐतिहासिक वारसाही संपन्न आहे. म्हणजे पार आठव्या शतकापासून. राष्ट्रकुटांच्या एका शाखेचं मुख्यालय लातूर असल्याचे ऐतिहासिक पुरावे मिळतात. त्यानंतर सातवाहन , शक, चालुक्य, देवगिरीचे यादव, दिल्ली आणि दक्षिणेतले बहामणी या राजघराण्यांची लातूरवर सत्ता होती. एकोणिसाव्या शतकात लातूरचा समावेश निजाम संस्थानात झाला. त्यावेळी लातूर नळदूर्ग तहसीलचा एक भाग होता, एकोणिशे पाचला स्वतंत्र लातूर तालुक्याची निर्मिती झाली, आणि उस्मानाबाद जिल्ह्यात त्याचा समावेश करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर म्हणजे हैदराबादमधे वल्लभभाई पटेलांनी पोलिस कारवाई केल्यानंतर निजाम संस्थानातलं उस्मानाबाद मुंबई राज्यात सामील झालं , आणि एकोणीस साठमधे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळी मराठवाड्याचा महाराष्ट्रात समावेश झाला , त्यामधे उस्मानाबाद होताच. पुढे बावीस वर्षांनी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणिशे ब्याऐंशीला लातूरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला , आता हा सर्व इतिहास आहे. लातूरने संपन्न इतिहासाचा वारसा घेत महाराष्ट्रातला एक अग्रक्रमाचा जिल्हा म्हणून नावलौकिक मिळवलाय.
राजकारण म्हटलं की विलासराव देशमुखाचं नाव ठळकपणे पुढे येतंय , पण त्यांच्याही अगोदर लातूरने शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे एक मुख्यमंत्री राज्याला राज्याला दिले . शिवाय सध्या देशाच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणारे शिवराज पाटील चाकूरकरही लातूरचेच. तसं लातूरही राजकारणही स्वतःचाच एक वेगळा पॅटर्न जपणारं आहे. कारण शिवराज पाटील असो की मुख्यमंत्री विलासराव पाटील या दोघांनाही या लातूरने एकेकदा पराभवाची चव चाखायला लावलीय. पण त्याची इथे चर्चा करण्याची आवश्यकता नाही.
तसंच लातूरच्या उद्योग विश्वाची झेपही लक्षणीय आहे. लातूरजवळची एमआयडीसी केव्हाच सॅच्युरेटेड झालीय. टीना ऑईल मील हे एक लातूरच्या इंडस्ट्रीमधलं एक ठळक नाव होतं. त्याशिवाय सर्वात लक्षवेधी म्हणजे लोकमान्य टिळकांनी लातूरमधे सूतगिरणी स्थापन केली होती. ते साल होतं एकणिशे एक. अगदी परवापर्यंत म्हणजे एकोणिशे पन्नासपर्यंत या सूतगिरणीत उत्पादन सुरू होतं. एकोणिशे चौसष्टमधे लातूरला वनस्पती तेलाचा सहकारी तत्वावरचा कारखाना सुरू झाला. डालडा फॅक्टरी हे या कारखान्याला लातूरकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेलं नाव. त्याचसुमारास कार्यरत असलेल्या लातूरच्याच जवाहर सूतगिरणीचा आशिया खंडातली सर्वात मोठी सूतगिरणी म्हणून उल्लेख व्हायचा.
सत्तरच्या दशकापर्यंत लातूरमधे सुमारे वीस सूतगिरण्या आणि सत्तर एक ऑईल मील्स होत्या. आज मात्र त्यातली एखादीच अभावाने आढळेल , उलट जिल्ह्याचा क्रॉप पॅटर्न गेल्या काही वर्षात झपाट्याने बदलला , आणि उस हे नगदी पिक सर्व शेतकऱ्यांनी निवडलं. आणि एकोणिशे चौऱ्याऐंशी साली फक्त एक सहकारी साखर कारखाना असलेल्या जिल्ह्यात आज पंधरापेक्षा जास्त कारखाने आहेत.
सध्या चलती असलेल्या आयटी मधेही लातूरच्या एसवायएस डॉट कॉम कंपनीने स्वतःचा ठसा उमटवलाय. लातूरमधे मुख्यालय असलेल्या या कंपनीचे सध्या जगभरात साडेतीन हजारपेक्षा जास्त क्लायंट आहेत.
लातूरच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घ्यायचा तर लातूर पॅटर्न हा एक शब्दच पुरेसा आहे. या शब्दाची अजूनही पुण्या मुंबईतल्या शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी धडकीच घेतली होती. दहावी आणि बारावीच्या बोर्डात राज्यातले पहिले क्रमांक लातूरच्या विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी राखीव करून टाकले होते. त्यात राजर्षी शाहू महाविद्यालय आणि अहमदपूरचं महात्मा गांधी विद्यालय तसंच लातूरचंच देशिकेंद्र विद्यालय यांनी खास नावलौकीक कमावला होता.
हे सर्व कोडकौतुक असलं तरी लातूरकरांना आजही दररोज पिण्याचं पाणी मिळत नाही, हेही आजचं वास्तव आहे. तसंच लातूरमधून जमिनीला पाडलेली भोकंही म्हणजे लातूरमधे घेण्यात आलेल्या बोअरवेल्स हाही एक सर्वाधिक चिंतेचा विषय. कारण या बोअरवेल्समुळेच लातूर आणि एकूणच मराठवाड्यातली भूजलपातळी कमालीची खालावलीय. नगरपालिका पिण्याचं पाणी पुरवायला अक्षम म्हणून लोकांनी जमिनीतून पाण्याचा अमाप उपसा केला, त्याचे परिणाम लातूरमधल्या येणाऱ्या पिढीला भोगायचे आहेत.