मास्तर, सातत्याने देतच राहिले…
हे जग सोडून गेल्यावरही त्यांनी आपल्या पार्थिवाचं विद्युतदाहिनीत दहन करण्याऐवजी वैद्यकीय संशोधनासाठी दान केलं.
हयातीतच त्यांनी आपलं सर्व काही – म्हणजे सदाशिवातलं राहतं घर, पुस्तकं आणि ज्याला रूढ अर्थाने संपत्ती म्हणता येईल असं सर्व काही साधना ट्रस्टला देऊन टाकलं.
प्रधान सरांची ओळख लहानपणीच शाळेच्या पुस्तकांमधून झालेली. त्यांनी लिहिलेला धडा होता आम्हाला, कुठल्या इयत्तेत ते आठवत नाही. पण मास्तरांची ओळख झाली, 1996 ला पुण्याला आल्यावर… तेव्हा कुणी मास्तरांना भेटायला सांगितलं ते आठवत नाही. बहुतेक पन्नालाल सुराणा असावेत किंवा गौरी देशपांडे किंवा साने गुरूजी स्मारकावर कुणीतरी सांगितलं असावं…
मास्तरांना पहिल्यांदा साधनेत भेटलो, तेव्हा साधनेचं कार्यालय आजच्या सारखं नव्हतं.. बांधकाम सुरूच होतं. पहिल्या मजल्यावर मास्तर भेटायचे.. त्यांना पुण्यात कशासाठी आलो, ते सांगितल्यावर त्यांनी आस्थेनं चौकशी केली, पुण्यात जर्नालिझमला ऍडमिशन घ्यायचीय म्हटल्यावर कुठे कुठे जायला हवं, त्याअगोदर पोटापाण्याचं किंवा राहण्याचं काय, कुठे कुठे सोय होईल… काही तरी पार्टटाईम नोकरी करायला हवी… असं बरंच काही… पहिल्याच भेटीत त्यांनी सांगितलं की नोकरी करतच शिकावं… आपल्या जबाबदारीवर शिकावं, घरच्यांवर किती बोजा टाकायचा. मग त्यांनी तीनचार पत्रं लिहिली.. पुण्यातल्या वेगवेगळ्या संपादकांच्या नावाने.. म्हणजे त्यावेळचे सकाळचे संपादक विजय कुवळेकर, लोकसत्ताचे अनिल टाकळकर, प्रभातचे माधवराव खंडकर आणि केसरीच्या संपादकांच्या अशी चार पत्रं त्यांनीच हातानी लिहिली. मजकूर साधाच.. अक्षर मोठं… मी मेघराजला ओळखतो… त्याला पुण्यात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचाय, त्याला अर्धवेळ नोकरी देता येईल का… त्यावेळी साध्या पत्राने कुणी नोकरी देईल, असं मलाही वाटलं नव्हतं. कारण मास्तरांनी दिलेलं पत्र घेऊन सगळ्यात आधी सकाळला गेलो तर तिथे कुवळेकरांपर्यंत पोहोचताही आलं नाही…. मराठी संपादकांनाही पीए असतो हे तिथेच पहिल्यांदा कळलं…
त्यानंतर लोकसत्तेत गेलो… तिथे टाकळकर होते, त्यांनी सांगितलं सध्या आमच्याकडे काही जागा नाहीत, असतील तर कळवू नंतर… केसरीत गेल्याचंही आठवतंय पण झालं काहीच नाही… मग प्रभातला गेलो, तिथे माधव खंडकर… संपादकांना भेटायचंय असं सांगितल्यावर तिथला बाहेरचा माणूस म्हणाला भेटा की मग आतच बसलेत माधवराव… बहुतेक प्रकाश ब्रह्मे असावेत… माधवराव भेटले, त्यांनीही प्रधान मास्तरांची आस्थेनं चौकशी केली, अर्धवेळ काम असल्याचं सांगितलं.. उद्यापासून या असंही सांगितलं.. हे सर्व रानडेची प्रवेश परीक्षा देण्यापूर्वीचं… प्रभातमध्येच पत्रकारितेचा पहिला दिवस साजरा झाला. मास्तरांनी दिलेल्या पत्रामुळे पत्रकारितेत प्रवेश झाला, रानडेमध्ये जाण्यापूर्वीच…
नंतर कधीतरी मास्तरांनी त्यांच्या घरी बोलावलं होतं… तेव्हा त्यांना यूनिक फीचर्समध्ये काम करत असल्याचं सांगितलं. बराचवेळ गप्पा झाल्या. त्यावेळी त्यांनी निघताना आचार्य जावडेकराचं आधुनिक भारत दिलं. भारतीय राजकारण समजून घ्यायचं असेल तर आधुनिक भारत वाचलंच पाहिजे, असंही आवर्जून सांगितलं. तसंच नंतर कधीतरी आलास तर पत्रकारितेवरची आणि गांधीजी वरची काही पुस्तकं देईन, असंही सांगितलं. कारण त्यावेळी मी पुणे विद्यापीठात बीए एक्स्टर्नलला गांधीयन थॉट्स हा विषय घेतला होता. त्यावेळी इंग्रजीही वाचत जा, असं आवर्जून बजावलं. माझ्याकडे आजही आधुनिक भारत आहे… मास्तरांनी दिल्यामुळे तो ग्रंथ आता माझ्याकडचा एक अमूल्य ठेवा आहे.
दोन हजार सालीच हैदराबादला गेल्यामुळे त्यांच्याशी नंतर संपर्क राहिला नाही. नंतर त्यांनी त्यांच्या राहत्या घराचा त्याग केल्याची बातमी थेट ईटीव्हीच्या बातम्यांसाठी रिपोर्टरने पाठवलेल्या इनपुटमुळेच कळाली… हैदराबादहून पुणे तसं बरंच लांब पण मुंबईत आल्यानंतरही त्यांना भेटायला जाणं जमलंच नाही, ते थेट आजपर्यंत…
पण बार्शीत गेल्यावर पहिल्यांदा त्यांच्या इच्छेप्रमाणे एक झाड नक्कीच लावणार आहे…