कॉमरेड ज्योती बसू भारताचे पहिले कम्युनिस्ट पंतप्रधान झाले असते. नियतीने म्हणा किंवा या देशाच्या राजकीय समीकरणातून त्यांना ही संधी मिळाली होती. पण सबंध पश्चिम बंगालमधलं सबंध राजकारणच केवळ काँग्रेस विरोध, त्यातल्या त्यात केंद्रातल्या सत्तेकडून सातत्याने डावलल्याचा आभास यावरच आधारित असल्यामुळे डाव्या पक्षांचा या प्रस्तावाला होकार मिळणं कधी शक्यच नव्हतं. म्हणूनच देशाला कम्युनिस्ट पंतप्रधान मिळाला असता तरी डाव्याचा गड असलेला पश्चिम बंगाल त्यांच्याकडे राहिला असता का हा महत्वाचा मुद्दा होता. कदाचित या प्रश्नाच्या उत्तरामुळेच डाव्या पक्षाच्या धुरंधरांनी संयुक्त आघाडीचा प्रस्ताव नाकारला आणि कुणाच्या ध्यानीमनी नसताना एच डी देवेगौडा या देशाचे पंतप्रधान झाले. पण एका कम्युनिस्ट धुरंधराकडे देशाचं नेतृत्व कधी गेलंच नाही.
पंतप्रधानपद असं सहजासहजी कुणाला मिळत नाही. असं चालत तर कधी येत नाही. अपवाद फक्त गांधी-नेहरू घराण्याचा… (या घराण्यात फक्त पंतप्रधानच जन्माला येतात) पंतप्रधान पद मिळवण्यासाठी कितीही पराकोटीचे प्रयत्न केले तरी ते कायम हुलकावण्या देत राहतं. नेहरू-गांधी घराण्याचा अपवाद सोडला तर आतापर्यंत झालेल्या एकाही पंतप्रधानांना ते पंतप्रधान म्हणून या देशाचं नेतृत्व करतील, असं वाटलं नव्हतं किंवा त्यासाठी त्यांनी लॉबिंगही केलं नव्हतं. ज्यांनी लॉबिंग केलं किंवा पंतप्रधानपदाचे उमेदवार स्वतःच्या नावाची घोषणा केली तरी या पदाने त्यांना हुलकावणी दिली.
पंतप्रधानपद नाकारणं ही डाव्यांची ऐतिहासिक चूक होती, अशी प्रांजळ कबुली ज्योती बसूंनी नंतर दिली. सुरवातीला तिसऱ्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा प्रस्ताव नाकारणाऱ्या डाव्या सहकाऱ्यांनीही नंतर या ऐतिहासिक चुकीची कबुली दिली. पण तोपर्यंत काळ बराच पुढे निघून गेला होता. पुन्हा बसूना अशी संधी कधीच मिळणार नव्हती, आता तर ज्योती बसूही आपल्यात नाहीत. पण त्यानंतर कुणीही कम्युनिस्ट नेता या देशाचं पंतप्रधानपद भूषवण्याचं स्वप्न पाहणार नाही, कारण ज्योती बसू वगळता कुणाही अन्य कम्युनिस्ट नेत्यामध्ये ही योग्यता नाही.
ज्योती बसूंनी फक्त पंतप्रधानपदच नाकारलं नाही तर जेव्हा पक्षाने त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारायचं नाही असा आदेश दिला, तेव्हा त्यांनी पक्षाच्या कसलीही नाराजी व्यक्त केली नाही. किंवा निवडक सहकाऱ्यांच्या मदतीने लॉबिंग केलं नाही. कारण हा निर्णय घेण्यात पॉलिट ब्युरो मेंबर म्हणून त्यांचाही सहभाग होताच, म्हणूनच कोणत्याही डाव्या नेत्याच्या अगोदर त्यांनी पंतप्रधानपद नाकारणं ही ऐतिहासिक चूक असल्याची कबुलीही दिली.
ज्योती बसूंचं कर्तृत्व फक्त पंतप्रधानपद नाकारण्यापुरतंच मर्यादित नाही तर त्याही अगोदर म्हणजे तब्बल 1977 पासून 2000 पर्यंत पश्चिम बंगालमधल्या आघाडी सरकारचं मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे होतं.
आता आपल्याकडे कुणी सलग तीन साडे तीन वर्षे मुख्यमंत्री राहिला की जाहिराती आणि शुभेच्छा पुरवण्यांचा मारा सुरू होतो, पण सर्वाधिक काळ एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा विक्रम केल्यानंतर प्रकृती साथ देत नाही म्हणून पद सोडण्याची तयारीही दाखवली.
हा सलग 23 वर्षाचा काळ भारताच्या राजकीय एतिहासातला एक महत्वाचा टप्पा आहे. पण पश्चिम बंगाल, डावे आणि ज्योती बसू यापैकी कुणीही एकमेकांपासून फारकत घेतली नाही. आता ममता बॅनर्जींच्या आंदोलनाने डाव्यांच्या साम्राज्याला घरघर लागतेय, ज्योती बाबूनींही एक्झिट घेतलीय, यावेळच्या विधानसभा निवडणुकीनंतर डावे सत्तेत राहतील की नाही, हाही मोठाच प्रश्न आहे.