कन्नूरला हिंसाचाराचा शापही राजकीयच ?

केरळ म्हणजे देवभूमी. केरळ सरकार असो की तिथली जनता, केरळला गॉड्स ओन कंट्री असं मोठ्या अभिमानाने मिरवून घेतात. पण या देवभूमीत उत्तरेकडे एक भाग असाही आहे की देवभूमीचेच लोक त्याचा उल्लेख नरक असा करतात. हा भाग आहे कन्नूरचा. कन्नूर हा केरळमधला एक जिल्हा. लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं तर राज्यातल्या तिसऱ्या क्रमांकाचं शहर. म्हणजे कोची, तिरूवनंतपुरम् आणि कोळीकोडनंतर कन्नूरचाच नंबर लागतो.

एका खाजगी संस्थेनं केलेल्या पाहणीनुसार, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, नागरी सेवा सुविधा, समाजजीवन या आघाड्यांवर कन्नूरचा देशातल्या टॉप टेन शहरात  लागतो. तरीही केरळवासियांना मात्र कन्नूर एक नरकभूमी वाटतं. कारण रास्व संघ आणि कम्युनिस्ट यांच्यात नियमित होणाऱ्या चकमकी. आतापर्यंत या राजकीय चकमकींमध्ये 200 जणांना जीव गमवावा लागलाय. या राजकीय चकमकींना तब्बल चाळीस वर्षांचा इतिहास आहे. या कन्नूरमधला तलासरी हा भाग कम्युनिस्टांचा बालेकिल्ला आहे. आणि हाच परिसर चकमकींचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. तलासरीमध्ये पहिला राजकीय खून झाला तो 1968 मध्ये. तेव्हापासून मारण्याचा आणि मरण्याचा हा सिलसिला थांबलेला नाही. या महिन्यात झालेल्या चकमकींचे पडसाद पार संसदेत उमटले. संसदेतच नाही तर राजधानी नवी दिल्ली, महाराष्ट्रात औरंगाबाद आणि आता पुण्यातही तलासरीच्या हिंसाचाराचे पडसाद उमटले आहेत. सध्या कन्नूरच्या तलासरीमध्ये शांतता आहे, मात्र तिथे किती दिवस शांतता राहू शकेल, याच ठाम उत्तर कुणापाशीच नाही. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या चकमकी एवढ्या भीषण होत्या, की त्यामध्ये सात जणांना जीव गमवावा लागला, एवढंच नाही तर कन्नूरमध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर केंद्रीय राखीव दलं तैनात करण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याचं मत केरळच्या हायकोर्टाने व्यक्त केलं होतं. कन्नूरच्या हिंसाचारात बळी पडलेल्यांवर जरा नजर टाकली तरी बरीच माहिती पुढे येते, म्हणजे या हिंसाचारात बळी पडलेल्यांपैकी 90 टक्के जणांचं फक्त शालेय शिक्षण झालंय तर 80 टक्के मागासवर्गीय समाजातून आलेले आहेत. कन्नूरच्याच एका प्राध्यापकांनी इथल्या राजकीय हिंसाचारावर पीएचडी केलीय. त्यांचं नाव प्रोफेसर टी. शशीधरण. ते सांगतात की या हिंसाचारात गेल्या चाळीस वर्षात 174 जणांचा बळी गेल्याचं सरकारी आकडेवारी सांगते. गंभीर जखमी झालेल्यांची तर कसलीच गणती नाही. हिंसाचार झाला की दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप होतात, मात्र हिंसाचार थांबावा म्हणून कुणीच प्रामाणिक प्रयत्न करत नाहीत. 25 लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात मुस्लीमांची संख्याही मोठी आहे. इथल्या हिंसाचारात तलवारी, छोट्या कुऱ्हाडी एवढंच नाही तर गावठी बॉम्बचाही वापर होतो. हल्ले अतिशय नियोजनबद्ध असतात. काही जणांना त्यांच्या घरात जाऊन मारण्यात येतं तर काही जणांना प्रवासात असताना. या राजकीय हिंसाचाराचं आणखी एक ठळक आणि जाणवण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 40 वर्षांतल्या या हिंसाचारात आतापर्यंत एकाही महिलेचा बळी गेलेला नाही.

kannur-district-map.jpg
1968 मध्ये पहिला बळी गेला तो राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे कार्यकर्ते वाडीक्कल रामकृष्णन् यांचा. तलासरीमधला हा पहिला राजकीय खून. तलासरी कन्नूरच्या दक्षिणेला 20 किलोमीटर अंतरावर आहे. सस्सरच्या दशकाच्या शेवटी आणि ऐंशीच्या दशकाच्या सुरवातीला तर 1998 – 2000 या दोन वर्षांच्या काळात तलासरीतला हिंसाचार शिगेला पोचला होता. पोलिसांची आकडेवारीही त्याला दुजोरा देते. तलासरीचा एकुणातला इतिहासच तसा रक्तरंजित आहे. 1971 मध्ये तलासरीत हिंदू-मुस्लीम दंगे झाले होते. त्यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट कार्यकर्ते मुस्लीमांच्या मदतीला आले आणि त्यांनी एक कार्यकर्ता गमावला. यू. के. कुंजीरामम् त्याचं नाव. 1970 च्या दशकात हा संघर्ष काँग्रेस विरूद्ध सीपीएम असा होता. 1977 च्या सुमारास त्याला आरएसएस विरूद्ध सीपीएम असं वळण लागलं.
आता तुम्हाला प्रश्न असा पडेल की हा असा हिंसाचार अचानक का उसळतो. तर त्याचं कारण आहे, फक्त बिनबुडाच्या अफवा, कसल्याही आगापिछा नसलेल्या. अशा अफवा पसरतात किंवा पसरवल्या जातात. तलासरीवर नियंत्रण कुणाचं असावं, हा कळीचा मुद्दा या हिंसाचारामागे आहे. आरएसएसला तलासरी हे केरळमधल्या कामकाजाचं मुख्य केंद्र बनवायचं आहे. सध्या कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असल्यामुळे ते शक्य होत नाही. म्हणून कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जातंय, असा आरोप सीपीएमचे नेते करतात. काही जणांच्या मते या परिसरच हिंसाचार प्रवण आहे. म्हणजे हा भाग आदिवासी योद्ध्यांचा आहे. कालारीपय्याटू आणि थिय्याम या प्राचीन युद्धकला इथल्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहेत. मात्र सीपीएमला हा तर्क मान्य नाही. कन्नूरमधला 90 हिंसाचार एकट्या तलासरी परिसरात होतो. जर संपूर्ण कन्नूर जिल्हा आदिवासी योद्ध्यांचा आहे तर एकट्या तलासरीतच का हिंसाचार होतो, असा सवाल कम्युनिस्ट नेते करतात. इथल्या काही लोकांच्या मते काही व्यक्तीगत आणि खाजगी भांडणं मोठ्या राजकीय हिंसाचाराला जन्म देतात. तसंच हिंसाचाराला बळी पडतात ते काही राजकीय पक्षांचे नियमित कार्यकर्ते नसतात. उलट पक्ष कार्यकर्त्यांना टारगेट करणं बरंच कठीण असतं. त्यामुळए बऱ्याचदा एखाद्या पक्षाचे समर्थक किंवा सामान्य लोकांचाच अशा हिंसाचारात बळी जातो. तरीही प्रश्न पडतो की हिंसाचार करण्यात सराईत असलेले तलासरीवासी आतापर्यंत दोनशेपेक्षा जास्त बळी गेल्यानंतरही शहाणे का होत नाहीत. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, तलासरीतल्या हिंसाचारात बळी पडणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मागे राहणाऱ्या कुंटुंबीयांची सर्व काळजी, त्यांच्या दररोजच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पक्षाकडून उचलली जाते. मग तो पक्ष कोणताही का असेना, रास्व संघ असो वा मार्क्सवादी कम्युनिस्ट. सर्व पक्ष त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांची योग्य ती काळजी घेतात. त्यांच्या कुटुंबीयांना पेन्शनही मिळतं ते वेगळंच. काही कार्यकर्त्यांना त्यांच्या पश्चात नातेवाईकांना नोकरीही मिळवून दिली जाते. म्हणूनच नेहमीच होणाऱ्या हिंसाचारात काही जणांचा बळी जातो. पुन्हा काही दिवस तलासरी शांत होते, पुढच्या हिंसाचाराची तयारी करते.

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: